विराट, रोहित, वॉर्नरमध्ये माझा विक्रम मोडण्याची क्षमता, ब्रायन लाराचा विश्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ब्रायन लाराने 2004 साली सेंट जॉन्समध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत नाबाद 400 धावांची संस्मरणीय खेळी करीत इतिहास रचला. कसोटी इतिहासातील ही सर्वोच्च खेळी ठरली. या घटनेला 16 वर्षे उलटून गेली तरीही ब्रायन लाराचा तो विक्रम अबाधित आहे. मात्र त्याचा हा रेकॉर्ड तीन खेळाडू मोडू शकतात असा विश्वास दस्तुरखुद्द ब्रायन लारा याने यावेळी व्यक्त केला. विराट कोहली, रोहित शर्मा व डेव्हिड वॉर्नर या तीन खेळाडूंमध्ये विक्रम मोडण्याची क्षमता असल्याचे त्याने यावेळी आवर्जून सांगितले.

डेव्हिड वॉर्नर आक्रमक फलंदाजी करतो. शिवाय तो सलामीला फलंदाजीला येतो. त्यामुळे त्याच्याकडून अपेक्षा करता येईल. तसेच विराट कोहली तिसऱया क्रमांकावर फलंदाजी करतो. एखादा फलंदाज झटपट बाद झाल्यास तो फलंदाजीला येऊन कसोटीत नवा इतिहास रचू शकतो. रोहित शर्मा ज्या दिवशी जबरदस्त खेळतो त्या दिवशी तो कोणताही विक्रम नोंदवू शकतो असे ब्रायन लाराला वाटते.

विराटची सेना आयसीसी स्पर्धा जिंकू शकते
2013 सालानंतर हिंदुस्थानला आयसीसीच्या महत्त्वाच्या स्पर्धा जिंकता आलेल्या नाहीत. पण विराट कोहलीच्या टीम इंडियामध्ये आयसीसीच्या स्पर्धा जिंकण्याची क्षमता आहे. हा संघ आयसीसीच्या सर्व स्पर्धा जिंकू शकतो. टीम इंडियाचा संघ बलाढय़ असल्यामुळे इतर संघ त्यांना टार्गेट करतात. त्यामुळे उपांत्यपूर्व किंवा उपांत्य फेरीच्या लढतीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागतो, असे मत ब्रायन लारा याने यावेळी व्यक्त केले.

स्टीवन स्मिथ ग्रेट, पण…
ऑस्ट्रेलियाचा महान खेळाडू स्टीवन स्मिथ हा ग्रेट खेळाडू आहे, पण एका डावात 400 धावा करण्याचा विक्रम तो करील असे वाटत नाही. कारण तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येतो. शिवाय तो आक्रमक फलंदाजीही करीत नाही, असे ब्रायन लारा म्हणाला.