
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
हिंदुस्थानचा तरुण, तडफदार आणि उद्योन्मुख खेळाडू मुंबईकर पृथ्वी शॉ याने खूप कमी वयामध्ये क्रिकेटमध्ये नाव कमावले आहे. आपल्या फलंदाजीने भल्याभल्यांना तोंडात बोटं घालण्यास भाग पाडले आहे. आता यामध्ये वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार आणि विक्रमवीर फलंदाज ब्रायन लारा याचेही नाव जोडले गेले आहे. पृथ्वी शॉ याच्या फलंदाजीमध्ये विरेंद्र सेहवागची झलक दिसून येते असे मत ब्रायन लारा याने व्यक्त केले आहे.
पदार्पणात शतक ठोकणारा आणि सध्या आयपीएल गाजवणाऱ्या पृथ्वीचे ब्रायन लाराने तोंड भरू कौतुक केले आहे. स्टार स्पोर्टस सिलेक्ट डगआऊटमध्ये बोलताना ब्रायन लारा म्हणाला की, पृथ्वी शॉ याच्या फलंदाजीमध्ये मला हिंदुस्थानचा माजी आक्रमक खेळाडू विरेंद्र सेहवागची झलक दिसते. तसेच तो एक परिपक्व खेळाडू असल्याचेही लारा म्हणाला. सेहवाग प्रमाणे पृथ्वी कट शॉट खेळण्यामध्ये महारथ मिळवले आहे, तसेच शॉर्ट-आर्म पूल शॉट खेळतानाही त्याच्यात सेहवागची झलक दिसते, असे लारा म्हणाला.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मी त्याला वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना पाहिले होते आणि त्याने चांगल्या धावाही जमवल्या होत्या. हिंदुस्थानच्या मैदानावर एखाद्या तरुण खेळाडूला धावा करताना पाहणे भारी वाटते. परंतु दुर्दैवाने जायबंदी झाल्याने तो ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकला, असेही लारा यावेळी म्हणाला. पृथ्वी सध्या फक्त 19 वर्षाचा असला तरी आयपीएलमध्ये एखाद्या सिनिअर खेळाडूप्रमाणे तो फलंदाजी करत असल्याचे लाराने म्हटले.

























































