वधू-वरांसोबत वऱहाडींनी केला अवयवदानाचा संकल्प

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकीकडे अवयदानाबाबत उदासीनता असताना सिन्नर तालुक्यातील दापूरमधील आव्हाड कुटुंबीयांनी मात्र समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे. मुलाच्या लग्नाचे औचित्य साधत लग्नाला येणाऱया वऱहाडी मंडळींनी अवयवदानाचा अर्ज भरून आगळावेगळा अहेर द्यावा, असे आवाहन आव्हाड कुटुंबीयांनी केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून वऱहाडी मंडळींनी 102 अवयवदानाचे अर्ज भरून आगळावेगळा अहेर दिला आहे.

नरेंद्र आव्हाड आणि दीपाली नागरे या दांपत्याचा विवाह सोहळा संगमनेर येथे पार पडला. यावेळी वराचे वडील सुभाष आव्हाड यांनी या विवाह सोहळ्यात अवयवदानाचा संकल्प करण्यात येणार असून वऱहाडी मंडळींनी अवयवदानाचा अर्ज भरून द्यावा हाच आमच्यासाठी अहेर असल्याचे आवाहन केले होते. त्याला उत्तम असा प्रतिसाद वऱहाडी आणि मित्रमंडळींनी दिला. अवयवदानाचे अर्ज भरण्यासाठी आव्हाड कुटुंबीयांनी मुंबई येथील केईएम रुग्णालयातील राज्य अवयव आणि उती पेशी प्रत्यारोपण संस्था या अवयदानाचे काम बघणाऱया संस्थेकडून अर्ज घेतले आणि अर्ज कसे भरायचे याची माहिती जाणून घेतली होती. या विवाहसोहळ्याप्रसंगी ज्येष्ठ नेत्ररोगतज्ञ ‘पद्मश्री’ डॉ. तात्याराव लहाने यांनी सर्व उपस्थितांना अवयवदानासंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच केईएम रुग्णालयाचे पल्मोनोलॉजिस्ट डॉ. स्वप्नील कुलकर्णी आणि अन्य अवयदान क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.

विवाह सोहळ्याच्या माध्यमातून दोन्ही कुटुंबीयांनी समाजासमोर नवा आदर्श घालून दिला आहे. अशा पद्धतीने अवयवदानाची जनजागृती झाल्यास अवयदान चळवळीला नक्कीच बळ मिळेल. भविष्यात लग्न समारंभ आणि अन्य सामाजिक कार्यक्रमात अशा पद्धतीने नागरिकांना आवाहन करून अवयदानाचे महत्त्व पटवून दिले पाहिजे, असे मत डोनर फॉर इंडिया फाऊंडेशनचे संचालक डॉ. ऋषिकेश आंधळकर यांनी व्यक्त केले.