14 वर्षांनंतर महावितरणला मिळाला मानव संसाधन संचालक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

राज्याच्या कानाकोपर्‍यापर्यंत  60 हजारहून अधिक कर्मचारी असलेल्या महावितरणला अखेर 14 वर्षांनंतर स्वतंत्र मानव संसाधन संचालक मिळाला आहे. वर्षानुवर्षे रिक्त असलेल्या या पदावर ब्रिगेडियर पवनकुमार गंजू यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महावितरणची 2005 मध्ये स्वतंत्र वीज वितरण कंपनी म्हणून नोंदणी झाली. तेव्हाच मानव संसाधन विभागाला स्वतंत्र संचालक मिळणे अवश्यक होते, मात्र आतापर्यंत हा कारभार कार्यकारी संचालकांमार्फत हाकला जात होता.

आता मानव संसाधन संचालक हे पद नव्याने सुरू करण्यात आले असून त्यावर मूळचे जम्मू-कश्मीर येथील असलेले ब्रिगेडियर पवनकुमार यांची नियुक्ती केली आहे. त्यांची तब्बल 38 वर्षे लष्करात सेवा झाली असून मानव संसाधन विभागाबरोबरच त्यांनी महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. कंपनीला स्वतंत्र संचालक मिळाल्याने येथे काम करणार्‍या हजारो कर्मचार्‍यांना फायदेशीर ठरणार आहे.