
>> ब्रिगेडियर हेमंत महाजन
अमेरिकेसोबत केलेल्या ‘कॉमकासा’ कराराचा हिंदुस्थानला होणार असलेला सर्वात मोठा फायदा म्हणजे अमेरिकेच्या मदतीने चीन व पाकिस्तानच्या हालचालींवर नजर ठेवता येणार आहे. हिंदुस्थानच्या तुलनेत अमेरिकेचे नौदल खूप मोठे व खूप बलाढ्य आहे. जगभरातील सर्वच समुद्रांमध्ये अमेरिकन नौदलाची जहाजे व पाणबुड्या कोणत्याही क्षणी तैनात असतातच. हिंद महासागरात आपले वर्चस्व निर्माण करण्याच्या तयारीत असलेल्या चिनी नौदलावर नजर ठेवण्यासाठी अमेरिकन नौदलाच्या सामर्थ्याचा वापर करून घेणे हिंदुस्थानला ‘कॉमकासा’मुळे शक्य होणार आहे.
अमेरिकेने प्रथमच ‘नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन’ या अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांच्या संघटनेबाहेरील एखाद्या देशाशी म्हणजे हिंदुस्थानशी ‘कॉमकासा’ करार केला आहे. त्याचे वेगळेच महत्त्व आहे. नाटो देशांसोबत अमेरिकेने ‘कम्युनिकेशन ऍण्ड इन्फर्मेशन ऑन सिक्युरिटी मेमोरंडम ऑफ ऍग्रीमेंट’ म्हणजेच ‘सिसमोआ’ हा करार केला आहे. त्या कराराचेच खास हिंदुस्थानसाठी तयार करण्यात आलेले रूप म्हणजे ‘कॉमकासा’! अमेरिकेच्या परराष्ट्र व संरक्षणविषयक धोरणांमध्ये हिंदुस्थानला किती महत्त्व दिले जात आहे याचे हा करार द्योतक आहे.
हिंदुस्थानने अमेरिकेसोबत 2002 मध्ये ‘जनरल सिक्युरिटी व मिलिटरी इन्फर्मेशन ऍग्रीमेंट’ (जीसोमिया)आणि 2016 मध्ये ‘लॉजिस्टिक्स एक्स्चेंज मेमोरंडम ऑफ ऍग्रीमेंट’ (लेमोआ) या करारांवर स्वाक्षर्या केल्या. आता केवळ ‘बेसिक एक्स्चेंज ऍण्ड को-ऑपरेशन ऍग्रीमेंट’ (बेका) हाच एक करार होणे बाकी आहे. अमेरिकेकडून उच्च तंत्रज्ञानावर आधारित संरक्षण सामग्री मिळविण्यासाठी कोणत्याही देशाला अमेरिकेसोबत या चार करारांवर स्वाक्षर्या कराव्या लागतात. ‘कॉमकासा’वर स्वाक्षर्या झाल्यामुळे आता हिंदुस्थान व अमेरिकेची सशस्त्र दले उभय देशांची लढाऊ जहाजे व लढाऊ विमानांदरम्यानच्या संचार प्रणालींचा वापर करू शकतील आणि गोपनीय माहितीचे आदान प्रदान करू शकतील.
‘कॉमकासा’मध्ये अनेक हिंदुस्थानकेंद्री बदल व अनेक अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. हिंदुस्थानच्या शंकांचे परिमार्जन करण्याचे सर्व प्रयत्न अमेरिका करीत आहेत. गेल्या काही वर्षांत भरपूर मनुष्यबळाकडून अत्याधुनिक व दळणवळणास सोप्या युद्ध सामग्रीकडे असा बदल सुरू आहे. जगभरात माहिती तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर होत आहे. अमेरिका, इस्रायल आणि रशिया असे यातले आघाडीचे निर्माते आणि वापरकर्ते आहेत. माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केले जाणारे संदेशवहन अत्यंत महत्त्वाचे झाले आहे.
डोकलाम येथे झालेल्या चिनी सैन्यांच्या हालचालीनंतर हिंदुस्थानसाठीदेखील अशाच प्रकारच्या प्रणालीची मोठी गरज जाणवू लागली आहे; त्याशिवाय चीनच्या वाढत्या हालचालींवर अंकुश ठेवण्यासाठी अमेरिकेलाही हिंदुस्थानची गरज आहे. गेल्या काही वर्षांपासून हिंदुस्थान-अमेरिका संबंधांत बरीच सुधारणा झाली आहे. अमेरिकेमध्ये स्थायिक असलेल्या लाखो हिंदुस्थानींनी अमेरिकेच्या विकासात व हिंदुस्थान-अमेरिका संबंध सुधारण्यात मोठा वाटा उचललेला आहे. तसेच हिंदुस्थानचा वाढता आर्थिक विकास दर आणि आशिया खंडातील एक मोठी असलेली बाजारपेठ या कारणांमुळे अमेरिकेला हिंदुस्थानबरोबरच्या संबंधांत सुधारणा करणे गरजेचे वाटले. अमेरिकी प्रणालींमध्ये सोबत येणारी माहिती ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
अमेरिकन अवकाश यंत्रणांच्या माध्यमातून जगभर हेरगिरी केली जाते. त्यामुळे माहितीचा वर्गीकृत साठा अमेरिकेकडे उपलब्ध असतो. डोकलामच्या वेळी चिनी सैन्याच्या हालचालींची माहिती अमेरिकन यंत्रणांनी प्रथम दिली होती. तंत्रज्ञानविषयक भागीदारीतूनच अशा प्रकारच्या माहितीची देवाणघेवाण शक्य आहे. ‘कॉमकासा’ची प्राथमिक चर्चा झाली, त्यावेळी हिंदुस्थानच्या सार्वभौमत्वाची चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली, परंतु सध्याच्या हिंदुस्थानी संगणक प्रणाली हिंदुस्थानी प्लॅटफॉर्मच्या आधारावरच काम करीत आहेत. त्यात अनेक अमेरिकन हार्डवेअरचा वापर सध्या हिंदुस्थान करीतच आहे. त्याला अमेरिकन प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला तर गतिमानता आणि परिणामकारकतादेखील साधता येईल. ‘कोड’ आणि ‘की’ हे यातले प्रमुख परिणामकारक घटक आहेत.
नवी दिल्लीस वाटाघाटी अधिकाधिक हिंदुस्थानच्या कलाने घेण्यास यश आले आहे. आपली माहिती चोरीला जाण्याची जी भीती व्यक्त केली जात आहे, त्याला विविध पर्यायांनी उत्तरे देण्याचा प्रयत्न अमेरिका करीत आहे. हिंदुस्थानच्या परवानगीशिवाय कुठल्याही प्रकारच्या माहितीचा वापर केला जाऊ शकत नाही, तसेच सहा महिन्यांच्या नोटीस कालावधीनंतर ‘कॉमकासा’ रद्दही करता येईल. म्हणून अमेरिकेशी सामरिक भागीदारी शहाणपणाची आहे. 2016 मध्ये अमेरिकेने हिंदुस्थानला ‘मुख्य संरक्षक भागीदार’ असा दर्जा दिलेला आहे. त्याचबरोबर अमेरिकेकडून हिंदुस्थानला एसटीए-1च्या (Strategic Trade Authorisation-1) यादीत टाकण्यात आले आहे. याचा परिणाम म्हणजे आता हिंदुस्थानला अमेरिकेकडून संरक्षण साहित्याबरोबरच तंत्रज्ञानसुद्धा आयात करणे सोपे होणार आहे. अमेरिकेने निर्माण केलेल्या काही संरक्षण प्रणाली हिंदुस्थान विकत घेऊ शकतो.
2002 मध्ये झालेला ‘जनरल सिक्युरिटी व मिलिटरी इन्फर्मेशन ऍग्रीमेंट’ आणि 2016 मध्ये झालेला ‘लॉजिस्टिक्स एक्स्चेंज मेमोरंडम ऑफ ऍग्रीमेंट’(लेमोआ) हे दोन्ही करार हिंदुस्थान-अमेरिका संरक्षण संबंधांत महत्त्वाची भूमिका पार पाडतात. या करारांनुसार दोन्ही देश एकमेकांची बंदरे व बेटे आपल्या संरक्षण व लष्करी कामासाठी वापरू शकतात. मात्र, युद्धाच्या काळात हा करार दोन्ही देशांवर बांधील नसेल.
अमेरिकेसोबत केलेल्या ‘कॉमकासा’ कराराचा हिंदुस्थानला होणार असलेला सर्वात मोठा फायदा म्हणजे अमेरिकेच्या मदतीने चीन व पाकिस्तानच्या हालचालींवर नजर ठेवता येणार आहे. हिंदुस्थानच्या तुलनेत अमेरिकेचे नौदल खूप मोठे व खूप बलाढ्य आहे. जगभरातील सर्वच समुद्रांमध्ये अमेरिकन नौदलाची जहाजे व पाणबुड्या कोणत्याही क्षणी तैनात असतातच. हिंद महासागरात आपले वर्चस्व निर्माण करण्याच्या तयारीत असलेल्या चिनी नौदलावर नजर ठेवण्यासाठी अमेरिकन नौदलाच्या सामर्थ्याचा वापर करून घेणे हिंदुस्थानला ‘कॉमकासा’मुळे शक्य होणार आहे. हिंद महासागरात जास्तच वावरू लागलेल्या चिनी पाणबुड्यांची माहिती मिळविण्यासाठी या कराराचा खूप लाभ होणार आहे.
यापूर्वी अमेरिकेसोबत केलेल्या जीसोमिया व लेमोआ या करारांमुळे हिंदुस्थानला अमेरिकेच्या ‘इंडो-पॅसिफिक कमांड’सोबतच सहयोग करता येत होता. ‘कॉमकासा’मुळे आता अमेरिकेच्या ‘सेंट्रल कमांड’सोबतही हिंदुस्थानचा सहयोग सुरू होईल. ‘इंडो-पॅसिफिक कमांड’चे कार्यक्षेत्र प्रशांत व हिंद महासागर हे आहे. अरबी समुद्र आणि मध्य व पश्चिम आशिया, तसेच उत्तर आफ्रिकेचा मोठा भाग ‘सेंट्रल कमांड’च्या कार्यक्षेत्रात मोडतो. त्यामुळे आतापर्यंत हिंदुस्थानला अरबी समुद्रातील पाकिस्तानी व चिनी नौदलाच्या हालचालींसंदर्भात, तसेच अफगाणिस्तान, इराण आदी देशांसंदर्भातील माहिती अमेरिकेकडून मिळू शकत नव्हती. आता ती मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. अमेरिकेकडून प्राप्त केलेल्या संरक्षण सामग्रीशिवाय स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित संरक्षण सामग्रीमध्येही अमेरिकेने विकसित केलेल्या उच्च कोटीच्या तंत्रज्ञानावर आधारित दळणवळण यंत्रणांचा वापर करण्याचा मार्ग ‘कॉमकासा’मुळे मोकळा झाला आहे.































































