
मध्यप्रदेशातून पिस्तूल आणून पुण्यात विक्री करणाऱ्या सराईतासह चौघांना युनीट सहाने अटक केली आहे. त्यांच्याकडून 11 पिस्तूलांसह 14 काडतुसे जप्त करण्यात आली. यातील आरोपीला मध्यप्रदेशातून पिस्तूलांची विक्री करणाऱ्याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी गजानन टोम्पे, एसीपी नारायण शिरगावकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश माने उपस्थित होते.
ज्ञानेश्वर उर्फ रुद्रा सर्जेराव डुकरे (वय 21, रा. नेवासा नगर मुळ टेंभी अंतरवाली, ता.घणसांगवी,जिल्हा जालना) असे अटक केलेल्या मुख्य सराईताचे नाव आहे. त्याने निखील उर्फ सनी बाळासाहेब पवार (वय 23, रा.लोणी काळभोर), युवराज बापू गुंड (वय 24 रा. वडकी गाव) आणि अमोल नवनाथ तांबे (वय 27 रा. राहूरी, नगर) यांना पिस्तूलांची विक्री केल्याचे उघडकीस आले.
गुन्हे शाखेच्या युनीट सहाकडून हद्दीत पेट्रोलिंग करण्यात येत होते. त्यावेळी एकजण केसनंद परिसरात पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने ज्ञानेश्वर डुकरे याला ताब्यात घेतले. अंगझडतीत त्याच्याकडून तीन पिस्तूले आणि सहा काडतुसे जप्त करण्यात आली. मध्ये प्रदेशातील आरोपी शंकर नायक (रा.उज्जैन ) याच्याकडून तो शस्त्र विकत घेउन पुण्यात विक्री करीत होता. त्याने निखील उर्फ सनी बाळासाहेब पवार , युवराज बापू गुंड आणि अमोल नवनाथ तांबे यांना पिस्तूलांची विक्री केल्याची कबुली दिली.
याप्रकरणी संबंधित इतर तिघांनाही अटक करण्यात आली. आरोपींकडून 11 पिस्तूल व 14 जिवंत काडतूसे असा 3 लाख 40 हजारांचा ऐवज जप्त केला. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदिप कर्णिक, वरिष्ठ निरीक्षक गणेश माने, मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंडे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, नितीन शिंदे, ऋषीकेश टिळेकर, शेखर काटे, प्रतिक लाहिगुडे, ऋषीकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषीकेश ताकवणे, नितीन धाडगे, ज्योती काळे, सुहास तांबेकर यांनी केली.
15 हजारांचे पिस्तूल 25 हजारांना
मुख्य आरोपी ज्ञानेश्वर डुकरे सराईत असून तो मध्यप्रदेशातील शंकर नायक याच्याकडून 15 हजारांत पिस्तूल खरेदी करीत होता. त्यानंतर पिस्तूल पुण्यात आणून 25 हजारांमध्ये विक्री करीत असल्याचे उघडकीस आले आहे. गुन्हे शाखेने पिस्तूलांचा मोठा शस्त्रसाठा जप्त करीत टोळीचे कंबरडे मोडले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश माने यांनी दिली आहे.
































































