
रशिया आणि यूक्रेनच्या युद्धाचे पडसाद सगळ्या जगावर पडताना दिसत आहेत. अनेक देशांना महागाईचा चटका बसत आहे. अन्नपदार्थांच्या किमती अव्वाच्या सवा झाल्याने महागाईने जनता त्रस्त झाली आहे.
या युद्धाचे पडसाद ब्रिटनमध्येही पडले असून तिथल्या आहारातील भाज्यांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. ब्रिटनमध्ये एका काकडीची किंमत 42 रुपये इतकी आहे. त्याखेरीज मिरची आणि टोमॅटोही महाग झाले आहेत. यामागे रशिया आणि यूक्रेनमधील युद्ध हे एक मुख्य कारण आहे.
ब्रिटनमध्ये काकडीच्या उत्पादनासाठी विशेष योजना करावी लागते. कारण, इथलं वातावरण थंड असतं. काकडीचं पीक उष्ण वातावरणात येतं. त्यामुळे ब्रिटनमध्ये या काकडीच्या उत्पादनासाठी ग्लास हाऊसेस बनवलेली असतात.
या ग्लास हाऊसेसमध्ये वातावरण उष्ण ठेवण्यासाठी नैसर्गिक गॅसचा वापर केला जातो. पण, हा गॅस यूक्रेनमधून आयात होत असल्याने त्याच्या किमतींवर परिणाम होत आहे. त्यामुळे काकडी, टोमॅटो आणि मिरचीच्या उत्पादनावर परिणाम झाला असून त्यामुळे काकडीच्या किमतीत वाढ झाली आहे. या किमतींमुळे तिथल्या सँडविचमधून काकडी, टोमॅटो गायब झाले आहेत. शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसला आहे.
























































