
पाकडय़ांची घुसखोरी अद्याप थांबलेली नसून आज पाकिस्तानातून पंजाबच्या फिरोजपूर सेक्टरमध्ये आलेले ‘मेड इन चायना’ ड्रोन सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) पाडले आहे. आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून हे ड्रोन 300 मीटर आत हिंदुस्थानच्या हद्दीत आले होते.
बीएसएफचे जवान गस्त घालत असतानाच हिंदुस्थानच्या हवाई हद्दीत काळ्या रंगाचे ड्रोन उडत असल्याचे निदर्शनास आले. जवानांनी तत्काळ फायरिंग करत सदर ड्रोन पाडले आहे. सुमारे 23 किलो वजनाचे हे ड्रोन असून त्याची 10 किलो वजन वाहून नेण्याची क्षमता आहे. दरम्यान, या ड्रोनसोबत ड्रग्ज, शस्त्र किंवा कोणतीही स्फोटके सापडलेली नाही. यावरून सदरचे ड्रोन त्याने आणलेले सामान हिंदुस्थानच्या हद्दीत टाकून परत जात असावे असा संशय आहे. त्यामुळे जवानांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली. दरम्यान पाकिस्तानातून हिंदुस्थानच्या हद्दीत ड्रोन येण्याची ही 67 वी घटना असल्याचे बीएसएफचे डायरेक्टर जनरल पंकज कुमार सिंग यांनी स्पष्ट केले आहे.
हे ड्रोन ताब्यात घेण्यात आल्यानंतर परिसरात शोध मोहीम सुरू केली गेली आहे. पहिल्यांदाच पंजाबामध्ये पाकिस्तानी ड्रोन पाडण्यात आल्याची घटना घडली आहे. प्राप्त माहितीनुसार शुक्रवारी रात्री जवळपास 11 वाजता बीएसएफ तुकडी 103 चे जवान अमरकोट भागात पेट्रोलिंग करत होते. दरम्यान, त्यांना ड्रोनचा आवाज ऐकू आला, त्यानंतर जवानांनी ड्रोनच्या दिशेने गोळीबार सुरू केला व ड्रोन पाडण्यात आलं.
























































