
सामना प्रतिनिधी । दापोली
पालेकोंड गावासह पंचक्रोशीमधील गावांतील संपर्क अधिक जलद गतीने होण्यासाठी बीएसएनएलचा टॉवर पालेकोंडात होणार या भाबडय़ा आशेने आजही ग्रामस्थ प्रतीक्षेत आहेत. टॉवर बांधण्यासाठी आणलेली यंत्रसामग्री या जागेवर गेल्या नऊ वर्षांपासून धूळखात पडली आहे.
तुळशी पंचक्रोशी परिसरातील गावांना मोबाईल सेवा मिळावी या प्रमुख हेतूने पालेकोंड येथे बीएसएनएल टॉवर उभारणीचा निर्णय झाला, मात्र ९ वर्षांनंतरही हा टॉवर उभा करण्यास अजूनही दूरसंचार निगमला मुहूर्तच मिळत नसल्याने येथील ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. कारण हा टॉवर उभारण्यासाठी नऊ वर्षांपूर्वी उभारलेली शेड वापर नसल्याने दुरुस्तीला आली आहे, तर यंत्रसामुग्रीला गंज चढत चालला आहे. मार्च १८ अखेर टॉवर सुरू करण्यात येणार असल्याचे दूरसंचार निगमकडून येथील ग्रामस्थांना आश्वासन देण्यात आले होते.
































































