#Budget2020 करदात्यांसाठी दोन पर्याय, पण ऐच्छिक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अर्थमंत्र्यांनी नवीन कररचना जाहीर करताना जुनीही कायम ठेवली आहे. कर भरण्यासाठी दोन पर्याय असून, यातील कोणता पर्याय निवडायचा हे करदात्यांसाठी ऐच्छिक असणार आहे. नव्या कररचनेत कर कमी करण्यात आला असला तरी, यात करदात्याचे एकूण उत्पन्न ग्राह्य धरले जाणार आहे. यामुळे विवरण सादर करताना कर वजावटीचा लाभ घेता येणार नाही.

2.50 लाखांपर्यंत उत्पन्न जुन्या आणि नवीन रचनेत करमुक्त आहे. तसेच अडीच ते पाच लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5 टक्के कर कायम असेल. मात्र, 5 ते 7.50 लाखांच्या उत्पन्नावर 10 टक्के, 7.50 ते 10 लाखांवर 15 टक्के, 10 ते 12.50 लाखांवर 20 टक्के, 12.50 ते 15 लाखांपर्यंत 25 टक्के अशी नवी कररचना आहे. 15 लाखांवरील उत्पन्नावर 30 टक्के कर कायम आहे.

वैयक्तिक करदात्यांसाठी नवीन रचना सुटसुटीत करण्याचा प्रयत्न असला तरी यामुळे मध्यमवर्गीयांची खरंच बचत होणार का? कर वजावटीच्या पर्यायावर पाणी सोडावे लागणार का? याबाबत कर सल्लागारांमध्ये मत-मतांतरे आहेत.

बँक खात्यातील रकमेवर 5 लाखांपर्यंत विमा कवच
‘पीएमसी’सह अनेक बँकांमधील घोटाळ्यामुळे हादरलेल्या ठेवीदारांना अर्थसंकल्पात दिलासा देण्यात आला आहे. बँक खात्यातील रकमेवरील विमा संरक्षणाची मर्यादा 5 लाखांपर्यंत वाढविली आहे. पूर्वी हे संरक्षण कवच 1 लाखांपर्यंतच्या रकमेवर होते. त्यामुळे ठेवींची रक्कम बुडण्याची भीती बहुतांशी बँक खातेदारांना असणार नाही.

करदात्यांना आहेत दोन पर्याय
करपात्र उत्पन्न         सध्याचा कर नवीन कर
0-2.50 लाख         0 टक्के    0 टक्के
2.50 ते 5 लाख       5 टक्के    5 टक्के
5 ते 7.50 लाख       20 टक्के   10 टक्के
7.50 ते 10 लाख     20 टक्के   15 टक्के
10 ते 12.50 लाख   30 टक्के   20 टक्के
12.50 ते 15 लाख    30 टक्के   25 टक्के
15 लाखांपेक्षा अधिक   30 टक्के  30 टक्के