
गुरुवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताच विरोधकांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. अर्थमंत्र्यांचे अर्थसंकल्पीय भाषण सुरू असतानाच प्रसारमाध्यमांशी संवाद साधणारे काँग्रेस नेते मनीष तिवारी म्हणाले की, आर्थिक तूट ‘अत्यंत चिंताजनक’ आहे.
‘अत्यंत चिंताजनक बाब म्हणजे वाढती आर्थिक तूट, कारण अर्थमंत्र्यांनी सादर केलेले आकडे हे स्पष्टपणे दाखवतात की या वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात 18 लाख कोटींहून अधिक निधी आर्थिक तूट दर्शवत आहे आणि ही संख्या आणखी वाढणार आहे’, असं तिवारी म्हणाले.
छत्तीसगडचे काँग्रेसचे प्रभारी सरचिटणीस सचिन पायलट यांनी जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, ‘हा अंतरिम अर्थसंकल्प होता. अर्थसंकल्पीय भाषण अधिक राजकीय होते आणि त्यात सर्वसामान्यांना कोणताही दिलासा नव्हता. सरकारची स्तुती करणे हे राजकीय विधान होते जे ते सहसा प्रत्येक कार्यक्रमात करतात. या अर्थसंकल्पाचा शेतकरी आणि तरुणांशी काहीही संबंध नव्हता’.
दरम्यान, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी अर्थसंकल्प निरुपयोगी असल्याचे म्हटले आहे, ‘हा अर्थसंकल्प जनतेसाठी नाही’, असंही त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं.
‘कोणताही अर्थसंकल्प विकासाचा नसेल आणि कोणताही विकास जनतेसाठी नसेल तर तो निरुपयोगी आहे. भाजप सरकारने जनविरोधी बजेटचे दशक पूर्ण करून एक लाजिरवाणा विक्रम केला आहे, जो पुन्हा कधीही मोडणार नाही कारण आता सकारात्मक सरकार येण्याची वेळ आली आहे’, असं अखिलेश यादव यांनी X वर म्हटलं आहे.


























































