Budget 2026 – केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला रविवारीच सादर होणार; ओम बिर्ला यांनी केली पुष्टी

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या कामाला आता वेग आला आहे. दरवर्षी अर्थसंकल्प 1 फेब्रुवाराला सादर करण्यात येतो. मात्र, यावर्षी 1 फेब्रुवारीला रविवार असल्याने यंदा अर्थसंकल्प 1 तारखेला सादर होणार किंवा त्याची तारीख बदलणार, याबाबत चर्चा होत होती. तसेच रविवारीच अर्थसंकल्प सादर होणार असल्यास त्या दिवशी शेअर बाजार सुरू राहण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत होती. आता या सर्व चर्चांना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पूर्णविराम दिला आहे. 1 फेब्रुवारीला म्हणजेच रविवारी अर्थसंकल्प सादर केला जाईल याची त्यांनी पुष्टी केली आहे.

१ फेब्रुवारी रोजी रविवारी असल्याने निर्माण झालेली अनिश्चितता आता संपली आहे आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर करणार आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितले की, अर्थसंकल्प सकाळी ११ वाजता संसदेत सादर केला जाईल. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २८ जानेवारीपासून सुरू होईल.

संसदीय कामकाजाच्या मंत्रिमंडळ समितीने अंतिम केलेल्या वेळापत्रकानुसार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २८ जानेवारी रोजी लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. अर्थसंकल्पीय अधिवेशन २८ जानेवारी रोजी सुरू होईल आणि २ एप्रिलपर्यंत चालेल. त्याचा पहिला टप्पा १३ फेब्रुवारी २०२६ रोजी संपेल. त्यानंतर, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा ९ मार्च रोजी होईल, जो २ एप्रिल रोजी संपेल. संसद सहसा शुक्रवारी तहकूब केली जाते. यावेळी, गुड फ्रायडे आणि त्यानंतर ३ एप्रिल रोजी येणारी साप्ताहिक सुट्टी असल्याने, अधिवेशन एक दिवस आधी संपू शकते.