मुंबईत दुधाच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात सामान्य माणसाला महागाईचा फटका बसणार आहे. मुंबईत दूध उत्पादक संघटनेने हा निर्णय घेतला आहे. म्हशीचे एक लिटर दुधामागे दोन रुपये वाढवण्यात आले आहे. पूर्वी म्हशीचे एक लिटर दूध हे 87 रुपयांना मिळत होते, ते आता 89 रुपयांना मिळणार आहे. पुढच्या काळात गणेश चतुर्थी, नवरात्र आणि दिवाळी असल्याने ऐन सणासुदीच्या काळात सामान्य माणसाला महागाईचे चटके खावे लागणार आहे.
मुंबईतल्या 3 हजार रीटेल दुकानदारांना 87 रुपये प्रतिलिटर दराने म्हशीच्या दुधाची विक्री होते. आता त्यांना 89 रुपये लिटर दराने दुध विकत घ्यावे लागणार आहे. ग्राहकांना म्हशीच्या दुधासाठी 93 ते 98 रुपये लिटर दराने आता दुध विकत घ्यावे लागणार आहे. गेल्या वर्षभरातील ही दुधाच्या दराची ही दुसरी दरवाढ आहे. या पुर्वी दुधाचे दर 85 वरून 87 रुपये करण्यात आले होते. त्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना फटका बसला होता.