दहिसरमधील तिवरांची कत्तल करून जागा विकासकाच्या घशात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

दहिसर प्रभाग क्र. 2 मध्ये तिवरांची कत्तल करून जागा विकासकाच्या घशात घातल्याचा प्रकार विधी समितीत शुक्रवारी शिवसेनेने उघड केला. संबंधित जागेच्या गैरवापराबाबत लोकायुक्तांनी कारवाईचे आदेश देऊनही सहाय्यक आयुक्तांनी दुर्लक्ष केल्यामुळेच ही परिस्थिती ओढवल्यामुळे प्रशासनाच्या हलगर्जीपणाविरोधात विधी समितीची सभा झटपट तहकूब करण्यात आली.

दहिसरच्या प्रभाग क्र. 2 मधील सरस्वती कॉम्प्लेक्स येथे रस्ता तयार करण्यासाठी कांदळवन क्षेत्राच्या 50 मीटरच्या आत विकासकाने तिवरांची कत्तल करून, तिवरे जाळून रस्ता तयार करण्यासाठी अनधिकृतपणे भराव टाकल्याचे विधी समितीच्या अध्यक्षा शीतल म्हात्रे यांनी विधी समितीत उघड केले होते. या प्रकरणाबाबत लोकायुक्तांकडे तक्रार केली असता त्यांनी संबंधित जागेवरील बांधकाम पाडण्याचे निर्देश देत विकासकावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणात दहिसर पोलीस ठाण्यात ‘एफआयआर’ही दाखल करण्यात आला आहे. मात्र पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी हे आदेश पाळले नाहीत. त्यामुळे संबंधित सहाय्यक आयुक्तांची चौकशी करून कामामध्ये दिरंगाई केल्याबद्दल त्यांना निलंबित करावे अशी मागणी करीत सभा झटपट तहकूब करण्याची मागणी फेब्रुवारीच्या सभेतही करण्यात आली. ज्योती अळवणी यांच्या अनुमोदनानंतर सभा सर्वानुमते तहकूब करण्यात आली होती. यावेळी तत्कालीन विधी समिती अध्यक्षा सुवर्णा करंजे यांनी पुढील सभेत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. प्रशासनाच्या या हलगर्जी कारभाराविरोधात विधी समितीची सभा पुन्हा कोणतेही कामकाज न करता झटपट तहकूब करण्यात आली.

तिवर असल्याचे पुरावे असूनही कारवाई टाळली
लोकायुक्त कार्यालयाकडून केलेल्या पाहणीत या जागेवर तिवरे असल्याच्या खुणा, झाडे जाळल्याचे आणि भरणी टाकल्याचे पुरावे देण्यात आले होते. या ठिकाणी विकासकाने बेकायदेशीरपणे पाण्याची लाइनदेखील मिळवली होती. असा अहवाल असूनही संबंधित पालिका अधिकाऱ्यांनी कारवाई केली नसल्याचे शीतल म्हात्रे यांनी स्पष्ट केले. शिवाय या जागेवर खासगी ट्रव्हल्सच्या गाडय़ा बेकायदेशीरपणे पार्किंग केल्या जात असल्याचेही म्हात्रे यांनी निदर्शनास आणून दिले.