
सामना प्रतिनिधी । ठाणे
ठाण्यातील लोकमान्यनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक दिगंबर ठाकूर यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा वर्तकनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. ठाकूर यांनी बांधलेल्या इमारतीमधील फ्लॅट त्यांनी आधीच एकाला विकलेला असताना हा फ्लॅट पुन्हा दुसऱ्या व्यक्तीला त्यांनी विकल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
कोपरी भागात राहणारे वैभव गायकवाड यांनी २०१३ मध्ये लोकमान्यनगर येथे दिगंबर ठाकूर यांच्या मालकीच्या वक्रतुंड अपार्टमेंटमध्ये फ्लॅट बुक केला होता. वैभव यांनी फ्लॅटसाठी लागणारे १२ लाख रुपये दिगंबर ठाकूर आणि त्यांचा सहकारी चंद्रभान कनौजीया याला धनादेश आणि रोखीद्वारे दिले. पूर्ण पैसे भरल्यानंतर फ्लॅटचा ताबा घेण्यासाठी वैभव गेले असता हा फ्लॅट पूर्वीच दुसऱ्या व्यक्तीला विकला असल्याचे त्यांना समजले. या प्रकारानंतर ठाकूर आणि कनौजीया यांच्याकडे त्यांनी पैशांची मागणी केली. मात्र त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. अशाच प्रकारे वैभव यांचा मित्र दगडू उंभे यांनीही याच इमारतीमध्ये फ्लॅट बुक केला होता. त्यांच्याकडूनही या जोडगोळीने ८ लाख ५० हजार रुपये घेऊन अशीच फसवणूक केली. या प्रकरणानंतर कनौजीया याला अटक केली.






























































