हिमाचलमध्ये इमारत कोसळली, 8 ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । सोलन

हिमाचल प्रदेशमधील सोलन येथे कुमारहट्टी- नाहन महामार्गाजवळ एका गेस्ट हाऊसची इमारत कोसळून झालेल्या अपघातात 8 जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये दोन जवानांचा समावेश आहे. तर ढिगाऱ्याखाली 35 जण दबल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आतापर्यंत यातील 28 नागरिकांना वाचवण्यात आले असून इतरांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढलेल्या 28 जणांमध्ये 18 जवान आहेत. तर मृतांमध्ये सात जवानांसह गेस्ट हाऊस चालवणाऱ्या मालकाच्या पत्नीचा व स्थानिकांचा समावेश आहे. ही घटना घडली तेव्हा या इमारतीच्या तळमजल्यावरील ढाब्यात आसाम रायफल्सचे काही जवान चहा पिण्यासाठी उतरले होते. त्यामुळे लष्कराचे 200 हून अधिक जवान, फायर ब्रिगेडचे अधिकारी आणि बचाव पथक ढिगारा उपसण्याच्या कामाला लागले आहे.

दरम्यान, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांनी मदत कार्य सुरू असून मदत कार्य लवकरात लवकर पूर्ण होईल असा विश्वास  व्यक्त केला. तसेच या घटनेची चौकशी केली जाईल असे ते म्हणाले.

हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. शनिवारी देखील अशीच काहीशी घटना येथे झाली. येथील सोलन येथून जाणारी गाडी मातीच्या ढिगाऱ्यासह एका नदीजवळ जाऊन पडली.