बुलढाणा जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे यशस्वी वाटचाल, 20 रूग्णांना मिळाला डिस्चार्ज, 4 जणांवर उपचार सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाने जगभर थैमान घातले असताना राज्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव चांगलाच वाढला आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोरोनाने शिरकाव करीत 24 रूग्ण बाधीत केले. कोरोना फैलाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध कडक उपाययोजनांची अंमलबजावणी केली. त्यामुळे जिल्ह्यात सकारात्मक वातावरण कोरोना निवळण्यासाठी तयार झाले आहे. आज 4 मे 2020 रोजी चिखली येथील एका रूग्णाने कोरोनावर मात केल्यामुळे त्याला सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे यशस्वी वाटचाल सुरू आहे.

जिल्ह्यात चिखली येथे तीन, चितोडा ता. खामगांव येथे दोन, शेगांव येथे तीन, देऊळगांव राजा येथे दोन, सिंदखेड राजा येथे एक, मलकापूर येथे चार आणि बुलडाणा येथे नऊ कोरोनाबाधीत रूग्ण आढळले होते. त्यापैकी आतापर्यंत बुलढाणा येथील पाच, शेगांव येथील तीन, चितोडा ता. खामगांव येथील दोन, चिखली येथील दोन, मलकापूर येथील चार, दे.राजा येथील दोन आणि सिंदखेड राजा येथील एक कोरोनाबाधीत रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. त्यामध्ये आज एका रूग्णाची भर पडली आहे. अशाप्रकारे एकूण 20 रूग्ण बरे झालेले आहे.

राज्य ग्रीन झोनमध्ये आणण्यासाठी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करा! मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट निर्देश

प्रशासनाने आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून राबविलेल्या उपाययोजनांमुळे आज एका रूग्णाचा दुसरा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. त्याला आनंदाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्यासह सर्व डॉक्टर्स, नर्सेस, ब्रदर्स यांनी टाळ्या वाजवून बरे झालेल्या रूग्णाचे स्वागत केले.  शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार उपचारादरम्यान संबंधित रुग्णांचे दाखल केल्यापासून दोन्ही अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. दोन्ही तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्याने चिखली येथील एका रुग्णाला डिस्जार्ज देण्यात आला आहे.  त्यांच्यावर उपचार करणारे सिस्टर्स व ब्रदर्स यांनी टाळ्या वाजवित त्यांना प्रोत्साहित केले व भविष्यासाठी चांगल्या आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या.

या कोरोनाबाधीत रूग्णांना तपासणी अहवालानंतर कोरोना संसर्ग वार्डात दाखल करुन या सर्वांवर उपचार करण्यात आले.  तसेच शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार या रुग्णांवर तसेच जिल्ह्यात संशयित आढळून येणाऱ्या रुग्णांवर शासकीय रूग्णालयातील आयसोलेशन कक्षात तपासणी, उपचार करण्यात आले. कोरोना बाधित आढळलेल्या या व्यक्तींचे दोन्ही स्वॅब घेवून तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. पहिला व दुसरा तपासणी रिपोर्ट निगेटीव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला. दोन्ही अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाल्याने शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सदर बाधीत रूग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना आज जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पंडीत यांनी डिस्चार्ज देवून घरी सोडण्यात आले.