
सामना प्रतिनिधी। बुलढाणा
मोताळा तालुक्यातील बोराखेडी पोलिसांनी 12 फेब्रुवारी रोजी धडक कारवाई करुन जवळपास एक कोटी रुपयांच्या नकली नोटासह एका आरोपीला अटक केली होती. अटक केलेल्या आरोपीला मोताळा न्यायालयासमोर उभे केले असता त्याला 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून चौकशीनंतर सत्य समोर येईल.
गुप्त माहितीच्या आधारे मिळालेल्या सूचनेवरुन 12 फेब्रुवारी रोजी बोराखेडी पोलिसांनी मोहेगाव आश्रम शाळेच्या मागे नकली नोटांसह किसन गजानन तायडे यास अटक केली होती. नकली नोटांची बॅग घेऊन एक टोळी आलेली असून नोटांची देवाणघेवाण होणार आहे. या माहितीच्या आधारे सदर कारवाई करण्यात आली होती. परंतु घटनास्थळावरुन आरोपीचे तीन ते चार साथीदार फरार होण्यात यशस्वी झाले होते. अटक करण्यात आलेल्या किसन तायडे यांचेकडून नकली नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत मोजदाद केल्यानंतर एक कोटी आठ लाख आठ हजारांच्या नकली नोटा जप्त करण्यात आल्या. आरोपीला तपासासाठी ताब्यात घेण्यासाठी मोताळा न्यायालयासमोर 13 फेब्रुवारी रोजी उभे करण्यात आले असता, त्यास 20 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी मध्ये ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. पोलीस कस्टडीमध्ये बाजीरावचा दणका दाखविल्यानंतर यामधील सत्य बाहेर येईल अशी आशा आहे. या नकली नोटांच्या आधारे पैशांचा पाऊस पाडून भोळ्याभाबळ्या जनतेला फसविण्याचा या टोळीचा प्रयत्न असल्याची शक्यता आहे. पुढील आरोपींना अटक केल्यानंतर सत्य बाहेर येईल अशी अपेक्षा आहे.
नकली नोटांचे कनेक्शनबाबत शोध सुरू
नकली नोटा प्रकरणातील आरोपींची 20 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कस्टडी मिळाली असल्यामुळे आम्ही या आठ दिवसात उर्वरित आरोपी अटक करण्यासोबतच या नकली नोटांचे कनेक्शन कुठपर्यंत आहे याचा छडा लावून मुख्य आरोपीस सुद्धा गजाआड करु असे मोताळा ठाणेदार माधवराव गरुड यांनी सामनाशी बोलताना सांगितले.

































































