
महायुती सरकारच्या बेताल वक्तव्य करणाऱ्या आणि भ्रष्टाचारी कलंकित मंत्र्यांचा राजीनामाच्या मागणीसाठी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज “जनआक्रोश आंदोलनाचा वार” बुलढाण्यात करण्यात आला. जिजामाता प्रेक्षगार मैदानाच्या परिसरात धरणे आंदोलनातून, निदर्शनातून भ्रष्टाचारी आणि कलंकित मंत्र्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे. झालीच पाहिजे.. ही मागणी रेटून धरण्यात आली.
रमी खेळणारे कृषी मंत्री , गृहराज्यमंत्र्यांच्या कुटुंबाचा डान्सबार, पैशांची बॅगा शेजारी ठेऊन घरात बसलेला मंत्री, अघोरी पूजा करणारा मंत्री , सामान्यांना ठोसा मारणारा लोकप्रतिनिधी अशा एकाहून एक प्रतिकात्मक जिवंत देखावे या आंदोलनात सादर करण्यात आले. हे देखावे लक्षवेधक ठरले. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी व नेत्यांनी महायुती सरकारच्या विरोधात आपल्या भाषणातून आक्रमक हल्ला चढवला. या आंदोलनाची सुरुवात “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या महाराष्ट्र गीताने झाली. कलापथकांनी सादर केलेल्या “दोन दिवसाची दुनिया पाहू द्या… आमच्या कष्टाचा आम्हाला खाऊ द्या” अशा प्रकारच्या गीतांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडली. जिल्हाभरातून आलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या धरणे आंदोलनात सहभाग घेतला.
सरकारविरुद्धचा लढा सुरूच राहील : आमदार सिद्धार्थ खरात
हे शासन फसवेगिरी करून सत्तेवर आलेले आहे. खोटे आमिष देऊन आलेले आहे. महाराष्ट्रातील मंत्री, आमदार यांनी प्रगती, विकास यावर काम करायच सोडून मंत्री काय करतात हे जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. कृषी मंत्री कोकाटे रमी खेळतो, मग म्हणतो शासन भिकारी आहे. सुसंस्कृत महाराष्ट्राला थोर परंपरा लाभलेली आहे. असं असताना या महाराष्ट्रातील मंत्री कलंक लावण्याचे काम करत आहेत. भ्रष्टाचार करायचा आणि पैसे कमवायचे हाच उद्योग सुरू आहे. या आंदोलनात दाखवलेल्या प्रतिकात्मक देखाव्यांनी मंत्री कसे काम करत आहेत हे पुन्हा एकदा जिवंत झालं. आंदोलनाची ही सुरुवात आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्याचा काम करून हे शेतकरी विरोधी सरकार खाली खेचण्यासाठी आगामी काळात हा लढा अधिक तीव्र करण्यात येईल असेही आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले.
राज्याची प्रतिमा खराब करण्याचं काम मंत्र्यांनी केले : जयश्री शेळके
आपले महाराष्ट्र राज्य महान आहे हे आपण देशात अभिमानानाने सांगतो. त्याच आपल्या राज्याचे मंत्री हनी ट्रॅप मध्ये अडकतात, मंत्री आईच्या नावाने डान्सबार चालवतात. कृषी मंत्री ऑनलाईन रमी खेळतात. एक एक कारनामे या सरकारचे बाहेर येत आहेत. सत्ताधारी पक्षाचे आमदार सर्व सामान्य माणसावर “बॉक्सिंग स्कील” दाखवत मारहाण करत, कॅन्टीन केसरी म्हणून मिरवतात. तरी देखील राजीनामे घेतले जात नाहीत. राज्याची प्रतिमा रसळतला नेल्या जात आहे. ही दुर्दैवाची बाब आहे. लाडक्या बहिणीच्या निधीला कट लावण्यात आला असून मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने झोपेच सोंग घेतले असल्याची खरमरीत टीका राज्य प्रवक्ता जयश्री शेळके यांनी केली.