श्री गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचे निधन

श्री गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचे वयाच्या 81 व्या वर्षी बुधवारी सायंकाळी पाच वाजता दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनाने शेगावनगरीसह संपूर्ण विदर्भावर तसेच श्री भक्तांवर शोककळा पसरली आहे.

गत तीन दिवसांपासून मल्टीऑर्गन फेल्यूअरमुळे शिवशंकरभाऊ पाटील यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. त्यांच्या सांगण्यानुसार त्यांच्यावर घरीच वरिष्ठ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात उपचार करण्यात आले. त्यांना कमी रक्तदाबाचा त्रास होता. त्यामुळे शहरातील डॉक्टरांसह बुलढाण्यातील डाँक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू होते. बुधवारी सायंकाळी पाच वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. भाऊसाहेबांमागे दोन मुले, तीन मुली, पत्नी तसेच नातवंडे, असा आप्त परिवार आहे. त्यांच्या निधनाने श्री भक्तांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. राजकारण, समाजकारणातील मान्यवर तसेच प्रशासनातील अधिकार्‍यांनीही त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी भेट देऊन शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. शेगावमधील अनेक व्यवसायिकांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून भाऊंच्या निधनाबद्दल दुखवटा पाळला. त्यांच्यावर साडेसहा वाजता शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या