
बहुचर्चित मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या वांद्रे-कुर्ला-कॉम्प्लेक्समधील (बीकेसी) भूमिगत स्थानकासाठी नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने शुक्रवारी टेंडर काढले आहे. एकूण 508 कि.मी.च्या या मार्गावर 12 स्थानके असून बीकेसीतील हे एकमेव स्थानक भुयारी असून जमिनीत 72 मीटर आतमध्ये ते बनविण्यात येणार आहे. हा देशातील पहिलाच बुलेट प्रकल्प असून त्यासाठी तब्बल 1.08 लाख कोटी खर्च येणार आहे. एनएचआरसीएलने बीकेसी स्थानकासाठी दुसऱयांदा टेंडर काढले आहे.
बुलेट स्थानकाच्या आरेखन आणि बांधकाम अशा कामांसाठी शुक्रवारी टेंडर काढण्यात आले असून स्थानकाचे काम ‘कट ऍण्ड कव्हर’ स्वरूपातील असणार असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट करीत म्हटले आहे. सी-1 पॅकेज अंतर्गत एकूण 467 मीटर लांबीचे स्थानक असून 66 मीटरचा व्हेण्टीलेशन शाफ्ट टाकण्यात येणार असून तोच शाफ्ट पुढे टनेल बोअरींग मशीन आत सोडण्यासाठी वापरण्यात येणार आहे. जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सीने (जायका) 0.1 टक्के व्याजाने 1.08 लाख कोटीचे कर्ज पुरविले आहे. केंद्र सरकार एनएचएसआरसीएलला 10 हजार कोटी, तर महाराष्ट्र व गुजरात सरकारने प्रत्येकी 5 हजार कोटी रूपयांचा निधी दिला आहे.
जमिनीखाली तीन मजल्यांचे स्थानक
या भुयारी स्थानकात सहा प्लॅटफॉर्म असणार असून 16 डब्यांची ट्रेन उभी करता येईल इतकी या प्लॅटफॉर्मची लांबी असणार आहे. ग्राऊंड लेव्हलपासून 24 मीटर अंतरावर खाली प्लॅटफॉर्मचे बांधकाम होणार आहे. जमीनीखाली एकूण तीन मजल्याचे स्थानक बांधले जाणार असून त्यात सर्व्हीस फ्लोअर, कॉनकोर्स आणि सर्वात खालच्या तिसऱया मजल्यावर प्लॅटफॉम असणार आहेत. मेट्रो – 2 बी लाईनच्या स्थानकाजवळ आणि एमटीएनएल बिल्डींग जवळ बुलेट ट्रेनच्या टर्मिनसचे प्रवेश व बाहेर पडण्याचे मार्ग असणार आहेत. स्थानकात नैसर्गिक प्रकाश येईल अशी रचना असेल.
या सुविधा असतील…
सिक्युरीटी, तिकीटींग, प्रतिक्षालय,बिझनेस क्लास लाऊंज, नर्सरी, रेस्ट रूम्स, स्मोकींग रूम्स, इन्फॉर्मेश किओस्क ऍण्ड इन्सीडेंटल रेसिडेन्ट, पब्लिक इन्फॉर्मेशन, अनाऊन्समेंट व सीसीटीव्ही सर्व्हेलंन्स अशा सुविधा असून मेट्रो, बस, ऑटो रिक्षा व टॅक्सी यांची कनेक्टीविटी असेल.
12 स्टेशन; 8 गुजरातमध्ये तर 4 महाराष्ट्रात
बुलेट ट्रेनच्या मार्गावर एकूण 12 स्थानके असणार असून त्यात 8 स्थानके गुजरातमध्ये तर 4 स्थानके महाराष्ट्रात असणार आहेत. साबरमती, अहमदाबाद, आणंद/नादियाड, वडोदरा, भरूच, सुरत, बिलीमोरा, वापी, ही आठ स्थानके गुजरातमध्ये तर बोयसर, विरार, ठाणे, बीकेसी अशी चार स्थानके महाराष्ट्रात आहेत.
वैशिष्टय़े
एकूण लांबी – 508.17 कि.मी.
कमाल वेग – 320 कि.मी.प्रति तास
लिमिटेड थांबे प्रवासाचा वेळ – 2.07 तास
सर्व थांबे प्रवासाचा वेळ – 2.58 तास
एकूण स्थानके – 12
गुजरात स्थानके – 8
महाराष्ट्र स्थानके – 4
डेपोची संख्या – 3 (गुजरात सुरत व साबरमती)
महाराष्ट्र – 1 (ठाणे )
ऑपरेशन कंट्रोल सेंटर (साबरमती )





























































