बुलेट ट्रेन हटाव.. पर्यावरण बचाव…भूमिसेनेचे मनोर येथे आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । ठाणे

गुजरातच्या धनदांडग्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घातलेला बुलेट ट्रेनचा घाट उधळून लावण्याचा निर्धार पालघरमधील भूमिसेनेने केला आहे. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने बुलेट ट्रेन हटाव.. पर्यावरण बचाव.. असा नारा देत भूमिसेना उद्या मंगळवारी मनोर येथे वृक्षारोपण करून आगळेवेगळे आंदोलन करणार आहे.

भूमिसेना आदिवासी एकता परिषदेचे अध्यक्ष काळूराम धोदडे यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्त्यांनी याआधी बुलेट ट्रेनविरोधात अनेकदा आंदोलने केली आहेत. जोपर्यंत बुलेट ट्रेन रद्द होणार नाही तोपर्यंत हा लढा सुरू राहील, असा निर्धार भूमिसेना आदिवासी एकता परिषदेने केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या आंदोलनाला ठाम पाठिंबा दिला आहे. उद्या मनोर येथे बुलेट ट्रेनपेक्षा पर्यावरण महत्त्वाचे आहे, असा संदेश देत भूमिसेना हजारो झाडांचे रोपण करणार आहे. या आगळ्यावेगळ्या उपक्रमात शिवसैनिकही सहभागी होतील, असे शिवसेना नेते व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.