
पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत असलेल्या बेगमपुरा, सातारा या दोन्ही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या दोन्ही घटनेत चोरट्यांनी 5 लाख 91 हजार 136 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी बेगमपुरा आणि सातारा पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कंपनीच्या कार्यालयातून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास सिडको गोलवाडी, रिंगरोड सालासार फरशी शॉपजवळ, धुळे-सोलापूर हायवे रोडवरील एस. व्ही. इंजिनीअरिंग कंपनीचे नवीन कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाचे कामकाज 9 जून रोजी नेहमीप्रमाणे बंद करून सर्वजण घरी गेले होते. त्यानंतर 11 जून रोजी कार्यालय उघडण्यात आले असता, त्यातून 1 लाख 41 हजारांचे पॉलिकॅबचे केबल, 82 हजारांचे बाथरूम फिटिंगचे सामान, असा एकूण 2 लाख 23 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविल्याचे समोर आले. या चोरीप्रकरणी मनोज रावसाहेब कदम (रा. द्वारकानगरी, वडगाव कोल्हाटी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सिडकोतून साडेतीन लाखांचे दागिने लंपास
सिडको हडको, एन-13 परिसरातील ए- सेक्टरमध्ये राहणारे आजम अलफ खान यांचे घर फोडून चोरट्यांनी 3 लाख 67 हजार 536 रुपयांचे सोन्याचे दागिने व रोकड लंपास केल्याची घटना 12 जून रोजी रात्री घडली. त्यांच्या घरात मध्यरात्री चोरट्यांनी प्रवेश करून 31 हजार रुपयांच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, 1 लाख 67 हजार 420 रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या, 94 हजार 116 रुपयांची सोनसाखळी, 25 हजार रुपयांच्या सोन्याच्या दोन अंगठ्या तर 50 हजार रुपयांची रोकड असा मुद्देमाल लंपास केला. या चोरीप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.