
सामना प्रतिनिधी । पारनेर
पारनेर शहरातील उपनगरांमध्ये अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत नवे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांना सलामी दिली. चार ठिकाणी घरफोडया करून दोन ठिकाणचा ऐवज चोरून नेण्यात चोरटे यशस्वी झाले तर दोन ठिकाणी चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही.
लोणी हवेली रस्त्यावरील शिवराज्य हाईटस मधील गबाजी किसन गुंजाळ यांच्या बंद फलॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. तेथील एईडी टिव्ही तसेच गॅस सिलेंडरची चोरी करून जवळील बाळासाहेब हिलाळ यांच्या बंगल्यास चोरट्यांनी लक्ष्य केले, मात्र तेथे त्यांच्या हाती काहीही लागले नाही.
लोणी हवेली रस्त्यानंतर सुपा रस्त्यावरील श्रीकृष्ण अपार्टमेंटमध्ये पहिल्या मजल्यावर असलेल्या भाउसाहेब मारूती डमरे यांच्या बंद फलॅटचे कुलूप तोडून पाच हजार रूपयांची रोख रक्कम तसेच सोन्याच्या दागीने चोरट्यांची लांबविले. तिसऱ्या मजल्यावरील बंद फलॅटही चोरट्यांनी फोडला, मात्र तेथे काहीही नसल्याने चोरटे तेथून पसार झाले. या अपार्टमेंटमध्ये प्रवेश करताना ज्या फॅलटमध्ये लोक राहण्यास आहेत त्या फलॅटच्या कडया चोरट्यांनी बाहेरून लाउन घेतल्या.पहाटे दोन ते सहा वाजण्याच्या दरम्यान चोरट्यांनी या चारही घरफोडया केल्या. श्रीकृष्ण अपार्टमेंटमधील रहिवासी सकाळी जागे झाल्यानंतर फलॅटचे दार न उघडल्याने त्यांनी इतरांशी संपर्क केला, मात्र सर्वांच्याच कडया बाहेरून लावण्यात आल्याने अपार्टमेंटमध्ये काहीतरी अघटीत घडल्याचा संशय नागरीकांना आला. काहींनी अपार्टमेंटबाहेरील मजुरांना कडया उघडयास सांगितल्यानंतर चोऱ्यांचा प्रकार उघड झाला.
यासंदर्भात गबाजी गुंजाळ तसेच भाउसाहेब डमरे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आल्यानंतर आर. एन. शेलार व एस. व्हि घनसावंत यांनी घटनास्थळी जाउन पंचनामा केला. ठसे तज्ञ तसेच श्वान पथकानेही चारही ठिकाणी भेटी देऊन चोरट्यांचे काही धागेदोरे हाती लागतात का याचा अंदाज घेतला. श्वान पथकाने श्रीकृष्ण अपार्टमेंटपासून सुपे रस्त्यापर्यंत माग काढला तेथून पुढे चोरटे एखाद्या वाहनातून पसार झाले असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. नवे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली आर. एन. शेलार हे पुढील तपास करीत आहेत.






























































