खळबळजनक! महाविद्यालयाजवळ महिलेचा जळालेला पाय आढळला

1911

चंद्रपूर शहरातील तुकूम भागातील विधी महाविद्यालय परिसरालगत महिलेचा जळालेला पाय आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस टीम-श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेमागचे सत्य शोधले जात आहे. चंद्रपूर शहरातील तुकुम भागातल्या विधी महाविद्यालय परिसरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एक अर्धवट जळालेला पाय आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

प्राथमिक तपासामध्ये हा एका महिलेचा पाय असल्याचे स्पष्ट झाले असून एका पॉलिथिनमध्ये गुंडाळून असलेला हा पाय अर्धवट जळालेल्या स्थितीत स्थानिक युवकाला आढळून आला. याची माहिती तातडीने रामनगर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी आपल्या पथकासह श्वान पथकालाही पाचारण करत या स्थळाचा पंचनामा सुरू केला. दरम्यान वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील या घटनास्थळी दाखल झाले आहेत. फॉरेन्सिक विभागाच्या चमूने घटनास्थळावरून सर्जिकल कामात वापरले जाणारे काही हातमोजे- कात्री आदी साहित्य देखील जप्त केले आहे. मात्र हे सर्व साहित्य इथे कसे आले? हा एखादा बनाव तर नाही ना? याचे उत्तर देखील पोलिसांना द्यावे लागणार आहे. चंद्रपूर शहराच्या या मार्गावर तुकूम परिसरातल्या मांस विक्रीची दुकाने आहेत. घटनास्थळाजवळ कोंबडी व बकरे यांच्या कापलेल्या तुकड्यांचे अवशेष देखील मोठ्या प्रमाणावर असून त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. श्वानपथकाला पाचारण केल्यावरही या घटनेचे गूढ उकलण्यात फारसे यश मिळाले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या