चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासाने एसटी, रेल्वे फुल्ल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

गणेशोत्सवासाठी कोकणात आलेले चाकरमानी गणरायाला निरोप देऊन परतीच्या प्रवासाला निघाले असल्याने कोकणासह मुंबईत जाणाऱ्या रेल्वे गाडयांना, एसटी बसेसना मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. महामार्गावर खासगी वाहनांची वर्दळही तितकीच वाढली असल्याने आज सकाळी भरणे येथील जगबुडी पुलावर वाहनांची कोंडी झालेली पाहावयास मिळाली.

गणेशोत्सवादरम्यान कोकणात मोठ्या संख्येने चाकरमानी येत असतात. पाच दिवसांचे गणराया आणि गौराईंना निरोप दिल्यानंतर चाकरमानी परतीच्या प्रवासाला निघतात. शनिवारी 7 सप्टेंबरला गणरायांना निरोप दिल्यानंतर चाकरमानी परतीच्या प्रवासाला निघाले असल्याने शनिवार सायंकाळपासूनच कोकण रेल्वे, एसटी बसेसना गर्दी झाली आहे. आज खेड रेल्वे स्थानक आणि बसस्थानकावर प्रवाश्यांची फार गर्दी झाली होती. खासगी बसेस किंवा अन्य वाहनाने प्रवास करण्यासाठी महामार्गावरील भरणे नाका येथे प्रवाशांची गर्दी झाल्याने खासगी प्रवाशी वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांचे सुगीचे दिवस आले आहेत.

गणेशोत्सवासाठी कोकणात आलेल्या चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुकर व्हावा यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने या मार्गावर जादा गाड्या सोडल्या आहेत. मात्र प्रवाशांची गर्दीच इतकी आहे की कितीही जादा गाड्या सोडल्या तरी त्या कमीच होत आहेत. खेड आगारातूनही चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी मुंबई, बोरिवली, भांडुप , ठाणे, पुणे या मार्गावर जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. जादा गाड्यांमुळे चाकरमान्यांचा प्रवास काहीसा सुकर झाला आहे. मात्र तरीही काल रात्रीपासून खेड स्थानकावर प्रवाश्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. एसटी व रेल्वे स्थानकावर झालेल्या गर्दीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खेड पोलिसांनी या ठिकाणी विशेष बंदोबस्त ठेवला आहे.