
भिवंडीत राहणारा एक तरुण एमडी आणि चरसचा साठा घेऊन भायखळय़ात आला होता. हे ड्रग्ज तो विकण्याच्या प्रयत्नात होता, पण गस्तीवर असलेल्या सजग भायखळा पोलिसांच्या तो हाती लागला आणि तीन कोटी 46 लाख 50 हजार किमतीचा ड्रग्ज पोलिसांनी जप्त केला.
बुधवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास भायखळा पोलीस ठाण्याचे बीट मार्शल भाबड, भोये आणि गांगुर्डे हे हद्दीत गस्त घालत असताना त्यांना हुमे चर्चजवळ लाल रंगाची इर्टिगा कार संशयास्पद आढळून आली. त्यांनी चालक साहिल जुनेद अन्सारी (24) याच्याकडे चौकशी केली असता तो दिशाभूल करणारी उत्तरे देऊ लागला. त्यामुळे भाबड यांनी रात्रपाळी निरीक्षक अनुप डांगे यांना संपर्क साधला. त्यानुसार त्याच परिसरात गस्त घालणारे डांगे हे अन्य उपनिरीक्षक कोळेकर, असाडे व पथकासह तत्काळ चर्चजवळ पोहचले. अधिकाऱयांनी गाडीची झडती घेतली असता त्यात 3 कोटी 42 लाख किमतीचा एक हजार 710 ग्रॅम एमडी व चार लाख 50 हजार किमतीचा चरस असा एकूण तीन कोटी 46 लाख 50 हजार किमतीचा ड्रग्जचा साठा मिळून आला. साहिलने ड्रग्ज कुठून आणले, तो कोणाला विकणार होता, याचा पोलीस तपास करत आहेत.