
मोबाईल केवायसी अपडेटच्या नावाखाली सीएची 10 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकाला उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर पोलिसांनी झारखंड येथून अटक केली. दुलारचंद मंडल असे त्याचे नाव असून त्याने 25 हजार रुपयांसाठी बँक खाते सायबर ठगाला वापरण्यास दिले होते, अशी माहिती तपासात समोर आली आहे.
तक्रारदार हे व्यवसायाने सीए असून ते कांदिवली येथे राहतात. जानेवारी महिन्यात त्यांना ठगाने पह्न करून मोबाईल केवायसी करण्यास सांगितले. जर मोबाईल केवायसी न केल्यास पह्न बंद होईल अशी भीती घातली. त्यानंतर केवायसीच्या नावाखाली ठगाने एक अॅप्स डाऊनलोड करण्यास सांगितले. ते अॅप्स डाऊनलोड होताच तक्रारदार यांच्या खात्यातून 10 लाख रुपये काढले गेले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदार याने उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला.
पोलीस उपायुक्त हेमराज राजपूत यांनी अधिकाऱयांना सूचना केल्या. वरिष्ठ निरीक्षक विजय चंदनशिवे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक बोरसे, सहाय्यक निरीक्षक संजय पवार आदींनी तपास सुरू केला. फसवणुकीचे पैसे ज्या खात्यात जमा झाले त्याची माहिती पोलिसांनी काढली. पोलिसांना एका खात्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक झारखंड येथे गेले. तेथून पोलिसांनी दुलारचंदला ताब्यात घेऊन अटक केली. व्यवसायाने रिक्षा चालक असलेल्या दुलारचंदने 25 हजार रुपये घेऊन ठगाला बँक खाते वापरण्यास दिले होते. फसवणुकीतील रकमेत काही पैसे दुलारचंदच्या खात्यात गेले होते. त्याला अटक करून मुंबईत आणण्यात आले होते. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. दुलारचंदच्या अन्य साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.
अडीच लाख रुपये वाचवले
फसवणूक झाल्यानंतर पहिला तास हा गोल्डन अवर्स मानला जातो. त्या वेळास नागरिकाने पोलिसांत धाव घेतली. अशा वेळी पोलीस तत्काळ तपास करून फसवणुकीचे पैसे फ्रिज करू शकतात. फसवणुकीच्या गुन्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत अडीच लाख रुपये वाचवले आहेत. ज्या खात्यात पैसे जमा झाले अशा खात्याची माहिती पोलिसांना मिळाली असून पोलीस त्यावरून पुढील तपास करत आहेत.

























































