
सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीवरून (एनआरसी) देशभरात उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी सरकारच्याच अपयशाची कबुली दिली. सीएए आणि एनआरसीबाबत जनतेपर्यंत योग्य संदेश पोहचवण्यासाठी आमचे सरकार कमी पडले असे ते म्हणाले.
कायदा मंजूर करण्याआधी सरकारने आधीच चांगली तयारी केली असती तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती. सुधारित कायद्याचा संदेश नागरिकांपर्यंत योग्य पद्धतीने पोहचवायला हवा होता, जनतेशी संवाद साधायला पाहिजे होता. ते सरकारला जमले नाही. त्याचाच फायदा घेऊन काँग्रेससारख्या विरोधकांनी अफवा पसरवल्या, जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला असा आरोप त्यांनी केला.
























































