नागरिकत्व कायद्यावरून भिडले,संघाच्या उलेमा बैठकीत राडा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सीएए) समर्थनार्थ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आयोजित केलेल्या उलेमा परिषदेत जबरदस्त राडा झाला. या परिषदेतच सीएएविरोधात पोस्टर्स झळकवत एका गटाने विरोधाच्या घोषणा दिल्या. यामुळे समर्थक आणि विरोधक भिडले व हाणामारी झाली.

सीएए आणि एनआरसीविरोधात देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. देशभरात विद्यार्थी आणि नागरिकांची मोठी आंदोलने झाली. उत्तर प्रदेशात आंदोलनाला हिंसक वळण लागून अनेकांचा मृत्यू झाला. आता सीएए कायदा समजून सांगण्यासाठी या कायद्याच्या समर्थनार्थ भाजपच्या मदतीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुढे आला आहे. संघाच्या राष्ट्रीय मुस्लिम मंचचे संयोजक, संघाचे नेते इंद्रेशकुमार यांनी नवी दिल्ली उलेमा परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेला देशभरातील दोनशेवर उलेमा आणि काही मुस्लिम नेते उपस्थित होते. परिषद सुरू होताच वादाची ठिणगी पडली. काही उपस्थितांनी सीएए आणि एनआरसीविरोधात घोषणाबाजी सुरू केली. घोषणाबाजी करणाऱ्यांना सभागृहाबाहेर हुसकावून लावण्याचा प्रयत्न झाला तेव्हा जोरदार राडा झाला. मुस्लिमांच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि घोषणा देणाऱ्यांना ताब्यात घेतले.

विरोध करणाऱ्यांना मीडियाने दाखवू नये – इंद्रेशकुमार
मुस्लिमांमधील कोटय़वधी लोकांना शांतता हवी आहे, पण काही लोक सैतानी विचाराचे आहेत. मीडियाने ‘इंसान’ आणि ‘सैतान’ यांना ओळखले पाहिजे. विरोध करणाऱ्यांना मीडियाने दाखवू नये असे उलेमा परिषदेचे संयोजक इंद्रेशकुमार यांनी म्हटले आहे.