गुन्हे वृत्त- मास्क न लावता तलवारीने केक कापला, बर्थ डे बॉयसह सहा जणांना बेडय़ा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘बर्थ डे आहे भावाचा…’ म्हणत कुर्ल्याच्या नेहरूनगरात काही तरुणांनी एकत्र येत समीरउद्दीन अन्सारी (20) याचा जल्लोषात वाढदिवस साजरा केला. कोणीही मास्क लावला नाही, सोशल डिस्टन्स ठेवला नाही. अन्सारीने तर तलवारीने केक कापला. वाढदिवस धडाक्यात झाला, पण काही वेळाने नेहरू नगर पोलिसांनी बर्थ डे बॉयसह सहा जणांना बेडय़ा ठोकल्या.

कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. त्यामुळे मास्क लावणे, सोशल डिस्टन्स ठेवणे हे बंधनकारक असतानाही अन्सारीच्या वाढदिवसाला कोणीही हे नियम पाळले नाहीत. इतकेच नाही तर, अन्सारीने हत्यारबंदी कायद्याचे उल्लंघन करीत थेट तलवार उपसली आणि तलवारीने केक कापून बर्थ डे साजरा केला. हे सर्व करताना त्याचा व्हिडीओदेखील काढला. ही बाब नेहरू नगर पोलिसांना कळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सर्जेराव पाटील व पथकाने तत्काळ तपास हाती घेऊन समीरउद्दीन अन्सारी याचे घर गाठले. त्याला ताब्यात घेऊन केक कापण्यासाठी वापरलेली तलवारदेखील जप्त केली. शिवाय नियम मोडणाऱया त्याच्या अन्य सहा मित्रांनादेखील अटक केली.