कवठे येमाईत बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिरूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील बारमाही बागायती क्षेत्र असलेल्या कवठे येमाई गावात मागील आठवड्यापासून बिबट्याने पाळीव प्राण्यांवर हल्ले सुरू केल्याने मोठी दहशत पसरली आहे. बिबट्या पाळीव प्राण्यांना भक्ष्य करीत असल्याने शेतावर वस्तीला असणाऱ्या लोकांची भीतीने गाळण उडाली आहे.

सोमवारी पहाटेच्या सुमारास येथील येडे बोऱ्हाडे वस्तीवरील प्राथमिक शाळेमागे वास्तव्यास असलेले शेतकरी म्हतु गणाजी वागदरे यांच्या घरानजीकच्या गोठ्यातून बिबट्याने एका 2 वर्षे वयाच्या कालवडीवर हल्ला करीत तिला ठार केले. त्याने दूरवर फरफटत नेऊन या कालवाडीचा फडशा पाडला. या घटनेत वागदरे यांचे सुमारे 35 ते 40 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे सचिन बोऱ्हाडे, दौलत बोऱ्हाडे यांनी सांगितले. मागील 30 दिवसांत बिबट्याकडून उपद्रवाच्या वारंवार घटना कवठे येमाई शिवारात घडत असून ग्रामस्थांमधून चिंता व्यक्त होत आहे.

मागील काही दिवसांत बिबटयाने अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ले करीत त्यांना ठार मारण्याच्या घटना घडल्या आहेत. यात घोडी, शेळी, मेंढी, कालवड, कोंबड्या, पाळीव कुत्रे यांचे नाहक बळी जात आहेत. एकीकडे कोरोना महामारीचे सातत्याने घोंगावात असलेले संकट, तर दुसरीकडे बिबट्याची दहशत आणि पाळीव प्राण्यांवर होत असलेले सततचे हल्ले यामुळे खासकरून शेतावर वस्ती करून राहणारे शेतकरी चांगलेच हादरले असल्याचे अनिल येडे यांनी सांगितले.

शिरूरच्या वनपाल चारुशीला काटे यांना याबाबत माहिती दिली असता त्यांनी घटनेचा तात्काळ पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यास शासनाकडून योग्य ती मदत दिली जाईल असे त्यांनी सांगितले तसेच घटनेची माहिती मिळताच वन कर्मचारी हनुमंत कारकूड यांनी घटनास्थळी सकाळीच भेट देत पंचनामा केला आहे. शेतकऱ्यांनीही अधिक सावधानता बाळगावी, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर, वनपाल चारुशीला काटे, वनरक्षक ऋषिकेश लाड, वनकर्मचारी हनुमंत कारकूड यांनी केले आहे. रात्र झाली की, बिबट्याचा भक्ष्यासाठी संचार सुरू होत असून त्यांच्या दहशतीने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने या ठिकाणी तात्काळ पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्या वर्षाराणी बोऱ्हाडे, मच्छिंद्र वागदरे, सोपान वागदरे, माउली बोऱ्हाडे आणि शेतकऱ्यांमधून होत आहे.