लग्नाच्या तीन दिवस आधी नवरीला कोरोना; नवऱ्याने लढवली अनोखी शक्कल!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॅलिफोर्नियात नुकताच एक अनोखा विवाहसोहळा पार पडला असून सोशल मीडियावर सध्या त्याचीच चर्चा आहे. याचे कारणही तसेच आहे. लग्नाच्या केवळ तीन दिवस आधीच नवऱया मुलीला कोरोनाची लागण झाली.तरीही नवऱयाने लढवलेल्या अनोख्या शक्कलमुळे हा विवाहसोहळा ठरलेल्या दिवशीच पार पडला आहे. तेदेखील कोणत्याही नियमांचे उल्लंघन न करता. ही कहाणी आहे कॅलिपहर्नियामध्ये राहणाऱया पॅट्रिक डेलगॅडो आणि लॉरेन जिमेनेझ या नवदाम्पत्याची.

यापूर्वी लॉकडाऊनमुळे त्यांच्या लग्नाची तारीख तीन वेळा हुकली होती. नोव्हेंबरच्या शेवटी त्यांनी लग्न करायचे ठरवले. परंतु लॉरेनची अचानक तब्येत बिघडली. तिला कोरोना झाल्याचे निदान झाले. अशा परिस्थितीत लग्न होणे कठीणच होते. परंतु नवऱया मुलाने हार न मानता अनोखी शक्कल लढवली. व्यवसायाने छायाचित्रकार असणाऱया जॅक्सनने या अनोख्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोत क्वारंटाईन असलेली नवरी घराच्या पहिल्या मजल्यावरील खिडकीजवळ बसली असून नवरा मुलगा जमिनीवर उभा आहे. लग्नात एकमेकांचे हात हातात न घेता त्यांनी सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी आपले हात लांबलचक दोरीने बांधलेले आहे. पोस्टमध्ये जॅक्सनने लिहिलंय, एवढय़ा कठीण परिस्थितीतही या जोडप्याने अंगठी बदलली आणि एकमेकांविषयीची भावना व्यक्त केली.