भाजपला फॅसिस्ट म्हणणे हा गुन्हा नव्हे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘फॅसिस्ट बीजेपी डाऊन’ अशा घोषणा देणे म्हणजे एखादा अपराध केला असे होत नाही, असे मद्रास उच्च न्यायालयाने म्हटले आहे. लुईस सोफिया या तरुणीला अटक करून तिच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता.

तामीळनाडू भाजपचे माजी अध्यक्ष आणि तेलंगणा व पुद्दुचेरीचे विद्यमान राज्यपाल तमीलीसाई सुंदरराजन यांच्या उपस्थितीत एका विमानप्रवासात भाजप सरकारविरोधात ‘भाजपच्या हुकूमशाहीचा निषेध असो’ अशा आशयाच्या घोषणा देणाऱया लुईस सोफिया या तरुणीला अटक करून तिच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. मात्र, अशा घोषणा दिल्या म्हणजे काही गुन्हा केला असे होत नाही, असे मत नोंदवत उच्च न्यायालयाने हा एफआयआर रद्द केला.

सोफियाने फक्त फॅसिस्ट बीजेपी अशी घोषणा दिली होती आणि हे शब्द उच्चारणे हा काही गुन्हा होत नाही. हे प्रकरण फारच किरकोळ आहे, असे निरीक्षण मदुराई खंडपीठाचे न्या. पी. धनाबल यांनी यासंदर्भात नोंदवले. लोकांना त्रास दिल्याबद्दल गुन्हा नोंदवण्याचे भारतीय दंड संहितेचे कलम 290 लागू करण्यासारखे येथे काहीही घडल्याचे आरोपपत्रात नमूद नाही याकडेही न्यायालयाने लक्ष वेधले आहे.

नागरी हवाई वाहतूक कायद्याखाली सुरक्षेला धोका पोहचवणारी बेकायदा कृती या कलमाखाली पोलिसांनी गुन्हा दाखल करायला हवा होता, असे तामीळनाडूचे भाजप अध्यक्ष के. अन्नामलाई यांनी या वेळी सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, या कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याचा प्रश्नच येत नाही. केवळ काही शब्द उच्चारण्याने विमानाची सुरक्षितता धोक्यात येत नसते, असे मत कोर्टाने व्यक्त केले.

1 सोफियाने ‘फॅसिस्ट बीजेपी’ अशी फक्त घोषणा दिल्याचे एफआयआर आणि आरोपपत्रातही म्हटले आहे. हे तर फारच किरकोळ आहे आणि असे शब्द बोलणे हा काही गुन्हा होत नाही.

2 हे आरोपपत्र आणि एकूणच प्रकरण आम्ही रद्द करत आहोत, असे न्यायालयाने म्हटले आहे.

चुकीच्या कलमांवरून झापले
पोलिसांनी टंकलिखित एफआयआरमध्ये नंतर लिहिलेली इतर कलमे, या प्रकरणी लावलेली चुकीची कलमे या साऱयाचा समाचार न्यायालयाने निकाल देताना घेतला आहे. अखेरीस, सोफियाच्या घोषणा देण्यामुळे कुठलाही गुन्हा झालेला नाही, असे सांगत कोर्टाने ही कारवाई रद्द करण्याची तिची विनंती मान्य करत याचिका निकालात काढली.