
सामना प्रतिनिधी, मुंबई
पुरुषाला नपुंसक म्हणणे हे त्याची बदनामी करण्यासारखे असून हा एक शिक्षेस पात्र असा गुन्हा ठरत असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. आंध्र प्रदेशातील महिलेने पतीपासून घटस्फोट मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल करून त्याला जाणीवपूर्वक नपुंसक म्हटले होते. पतीने तिच्या विरोधात दाखल केलेला खटला रद्द व्हावा म्हणून या महिलेने उच्च न्यायालयात धाव घेतली असता तिचा दावा फेटाळून लावत न्यायालयाने एखाद्या पुरुषाला नपुंसक म्हणणे हा शिक्षेस पात्र गुन्हा ठरत असल्याचे म्हटले आहे.
आंध्र प्रदेशमधील एका महिलेने घटस्फोटासाठी अर्ज करताना न्यायालयात सर्वांदेखत तिचा पती नपुंसक असून त्यांना झालेले मूल हे वैद्यकीय शास्त्रातील आधुनिक पद्धतीतून झालेले असल्याचे म्हटले होते. पत्नीने नपुंसक म्हणणे हे पतीला अपमानजनक वाटल्याने पतीने तिच्या विरोधात नागपूरच्या दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून दंडाधिकाऱ्यांनी सदर महिलेविरोधात खटला चालवण्याचे आदेश दिले होते.
या आदेशाला आव्हान देत महिलेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि तिच्यावरील आरोप रद्द करण्याची विनंती केली. तिने युक्तिवाद केला की, ‘त्याला नपुंसक म्हणण्यामागे त्याचा अपमान करणे हा आपला हेतू नव्हता. फक्त माझ्या नवऱ्याची वैद्यकीय स्थिती सांगण्याकरिता न्यायालयात तसे सांगितले. त्यांच्या ‘त्या’ वैद्यकीय परिस्थितीमुळे मी आई बनू शकत नव्हते’ असे तिने न्यायालयात सांगितले. परंतु मुंबई उच्च न्यायालयाने तिचे सर्व दावे फेटाळून लावले व पतीला किंवा कोणत्याही पुरुषाला नपुंसक म्हणणे हा गुन्हा असल्याचे स्पष्ट केले. ‘एखाद्या पुरुषाला नपुंसक म्हटल्याने त्याचा त्याच्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. तसेच समाजही त्या व्यक्तीबाबत एक मत तयार करायला लागतो. त्यामुळे या शब्दाचा वापर करणे हा गुन्हाच असून अशा व्यक्तीविरोधात बदनामी केल्याचा गुन्हा दाखल करता येतो असे मत न्यायालयाने व्यक्त केले.
summary- calling impotent to any man is a case of defamation says high court





























































