
महानगरपालिका निवडणुकीत कोण कुणाच्या विरोधात लढणार हे उमेदवारी अर्जाच्या माघारीनंतर आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये सर्वत्र निवडणूक ‘कोण आला रे कोण आला…’, ‘येऊन येऊन येणार कोण…’, ‘ताई माई आक्का, विचार करा पक्का आणि मारा शिक्का…’ अशी घोषणाबाजी करत प्रचाराचा धडाका सुरू होणार आहे. उद्याचा पहिलाच रविवार हा ठिकठिकाणी निघणाऱया उमेदवारांच्या प्रचार रॅली आणि सभांनी चांगलाच गाजणार आहे.
महापालिका निवडणुकीतील संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी जाहीर केली नाही. काही उमेदवारांना तर पक्षाचे एबी फॉर्म देऊन थेट निवडणूक कार्यालयात पाठविण्यात आले. यामुळे अनेकांनी गाजावाजा न करताच उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्जाची छाननी आणि माघारीनंतर निवडणूक रिंगणातील उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर आता सर्वच उमेदवारांनी प्रचाराची जोरदार तयारी सुरू केली आहे. शनिवारपासूनच उमेदवार आणि त्यांचे समर्थक प्रचारासाठी मैदानात उतरले असून रविवार हा मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे.
सुट्टीच्या दिवशी मतदारांना गाठण्यावर भर
पहिल्या टप्प्यात घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर आहे. सुट्टीच्या दिवशी अनेक मतदार निवांत असतात. इतर दिवशी कधी घरी न सापडणारी मंडळी त्या दिवशी हमखास भेटते. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी मतदारांना गाठण्यासाठी सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत अनेक उमेदवारांनी प्रचारफेऱ्यांचे नियोजन रविवारी केले आहे.
सोशल मीडियावर भर
यावेळी सोशल माध्यमावर अधिक भर आहे. अनेक उमेदवारांनी मतदारांना भावतील अशा जाहिरातींबरोबर रिलद्वारे निवडून आल्यावर आपण काय करणार आहे, हे सांगायला सुरुवात केली आहे.
हातात फक्त दहा दिवस
महानगरपालिका निवडणुकीचा जाहीर प्रचार 13 जानेवारीला सायंकाळी 5 वाजता संपणार आहे. त्यामुळे मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी मतदारांना फक्त दहा दिवस मिळणार आहेत.

































































