14 मतदारसंघांत निवडणूक प्रचार थंडावला; मातब्बर नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

लोकशाहीच्या सर्वात मोठय़ा उत्सवातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचार रविवारी सायंकाळी थंडावला. या निवडणुकीच्या  प्रचारासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मातब्बर नेत्यांची फौज मैदानात उतरवली होती. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बारामतीच्या मुळावरच घाव घालण्याच्या दिलेल्या आव्हानाला शरद पवारांनी प्रत्युत्तर देत उखड काय उखडायचे ते, असे प्रत्युत्तर दिल्याने यंदा आर या पारची लढाई असल्याचे राजकीय संकेत मिळत आहे. या  राजकीय वाक्युद्धामुळे भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्वाची लढाई कोणत्या स्तरापर्यंत आली आहे त्याचा निवडणूक प्रचारात प्रत्यय आला आहे.

राज्यात तिसऱ्या टप्प्यात जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद (संभाजीनगर), रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या लोकसभा मतदारसंघांत मतदान होत आहे.  या निवडणुकीतील बारामतीमध्ये शिवसेना-भाजप महायुतीच्या कांचन कुल व  काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीच्या सुप्रिया सुळे यांच्या लढतीसह माढा मतदारसंघातील महायुतीचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर विरोधात महाआघाडीचे  संजय शिंदे यांची लढत आणि नगरमधील महायुतीचे डॉ. सुजय विखे-पाटील विरोधातील महाआघाडीचे संग्राम जगताप यांच्या लढती राष्ट्रवादी काँग्रेससाठी अतिशय प्रतिष्ठेच्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी भाजपने प्रतिष्ठा पणाला लावली आहे. म्हणूनच बारामतीमध्ये झालेल्या जाहीर सभेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बारामतीच्या मुळावर घाव घाला, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यामध्ये प्रत्युत्तर देताना अमित शहा यांचा समाचार घेतला. उखड काय उखडायचे ते, महाराष्ट्राची माती तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिआव्हान दिले. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील प्रचार राजकीय वर्तुळात अधिक चर्चेत आला. मात्र सायंकाळी या 14 मतदारसंघांतील प्रचार संपुष्टात आला. आता मंगळवार, 23 एप्रिलला होणाऱ्या मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

249 उमेदवार रिंगणात

राज्यात तिसऱ्या टप्प्यात वेगवेगळय़ा राजकीय पक्षांचे 249 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या टप्प्यात 2 कोटी 57 लाख 89 हजार 738 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तिसऱ्या टप्प्यातील 249 उमेदवारांमध्ये 19 महिला उमेदवारांचा समावेश आहे. बारामती मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे चार महिला उमेदवार रिंगणात आहेत. पुणे मतदारसंघात 31 तर माढा मतदारसंघातही 31 उमेदवार रिंगणात आहेत.