कॅनडामध्ये 50 वर्षांत प्रथमच आणीबाणी लागू; ट्रक चालकांचे आंदोलन चिरडण्यासाठी पंतप्रधान ट्रुडो यांचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॅनडामधील परिस्थिती बिकट होत असून पंतप्रधान जस्तिन ट्रुडो (Canada PM Justin Trudeau) यांनी देशात आणीबाणी लागू (Emergency Act in Canada)केली आहे. सोमवारी त्यांनी देशात आपातकालीन कायदा लागू करण्याची घोषणा केली. कॅनडामध्ये 50 वर्षात पहिल्यांदाच आपातकालीन कायदा लागू करण्यात आला आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लागू केलेल्या निर्बंधांविरोधात ट्रक चालकांनी ऐतिहासिक आंदोलन सुरू केले. संतप्त हजारो आंदोलकांनी थेट पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांच्या घरावर धडक मारली. 50 हजारांहून अधिक ट्रक चालकांनी 20 हजारांहून अधिक ट्रकचा ताफा पंतप्रधानांच्या घराभोवती उभा करून चहूबाजूंनी घेराव घातला. हे आंदोलन चिघळण्यापूर्वी ठेचून काढण्यासाठी पंतप्रधानांनी आणीबाणीची घोषणा केली.

पत्रकारांशी संवाद साधताना पंतप्रधान जस्तिन ट्रुडो (Canada PM Justin Trudeau) म्हणाले की, ‘कोरोना लसीकरणाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आव्हान सरकारपुढे आहे. यामुळे जनक्षोभ उसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे देशात आपातकालीन कायदा लागू करण्यात येत असून याचे सर्वांनी पालन करावे.’ तसेच हा आणीबाणी कायदा RCMP ला आवश्यक असेल तेथे नगरपालिका उपनियम आणि प्रांतिक गुन्ह्यांची अंमलबजावणी करण्यास सक्षम करेल, असेही ते म्हणाले

लोकांच्या हिताचा निर्णय

आपातकालीन कायदा कॅनडाच्या लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी, लोकांच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी आणि सरकारी संस्थांना विश्वास प्रदान करण्यासाठी लागू करण्यात आल्याचेही ते म्हणाले. हा कायदा अचानक लागू केल्याने पोलिसांना ज्या सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर मेळावे आणि संशयास्पद हालचालींवर प्रतिबंध लावून सेवा सेवा सुरळीत करण्याचे अधिकार देतात. तसेच हा कायदा लागू केल्याने सरकारला आवश्यक सेवा रस्त्यावरील ट्रक, बेकायदेशीर आंदोलनकर्ते यांना हटवण्याचा अधिकार प्राप्त करून देतो.

लसीकरण सक्तीचे

कॅनडात कोरोना लसीकरण सक्तीचे केले आहे. त्याचबरोबर वाढता संसर्ग रोखण्यासाठी सरकारने कडक निर्बंध जैसे थे ठेवले आहेत. या निर्बंधांविरोधात देशभरातील हजारो ट्रक चालक रस्त्यावर उतरले आहेत. या ट्रक चालकांनी आपल्या जवळपास 70 किलोमीटर लांब ट्रकच्या ताफ्याला ‘फ्रिडम कान्वॉई’ असे नाव देऊन सरकारविरुद्ध लढा पुकारला आहे. आंदोलकांनी पंतप्रधान ट्रुडो यांना पळताभुई थोडी केली. घराभोवती 20 हजारांहून अधिक ट्रकचा घेराव घालताच ट्रुडो यांनी गुप्तपणे घर सोडले. आंदोलकांनी त्यांच्याविरुद्ध अश्लील स्वरुपाची घोषणाबाजी करून पंतप्रधान निवासस्थानाचा परिसर दणाणून सोडला. याच वेळी रस्त्यावर उभ्या राहिलेल्या ट्रकचे हॉर्न सतत वाजवून आंदोलकांनी ट्रुडो सरकारच्या कानठळ्या बसवल्या. आंदोलकांनी लहान मुले, वृद्ध मंडळी आणि दिव्यांग लोकांनाही सोबत घेतले होते.

विज्ञानविरोधी ट्रकवाल्यांचा संपूर्ण देशाला धोका – ट्रुडो

लसीकरणाला विरोध करण्याच्या ट्रक चालकांच्या भूमिकेवर पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. ट्रक चालक विज्ञानविरोधी आहेत. ते केवळ स्वतःसाठीच नव्हेत, तर संपूर्ण देशासाठी धोका निर्माण करीत आहेत, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान ट्रुडो यांनी दिली आहे.