
सामना ऑनलाईन । ओटावा
पाकिस्तानमध्ये हिंदू नागरिकांचं जबरदस्तीने धर्मपरिवर्तन करत असल्याचं सांगत कॅनडा येथे पाकिस्तान विरोधात जोरदार मोर्चेबाजी झाली आहे. ही निदर्शनं पाकिस्तानच्याच सिंध प्रांतातील हिंदूंकडून होत आहेत.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, या निदर्शकांनी पाकिस्तानविरोधात निदर्शनं करताना, पाकिस्तानमध्ये हिंदू तरुणींचं अपहरण करून त्यांना धर्मपरिवर्तन करण्यास भाग पाडलं जातं. तसंच त्यांच्यावर बलात्कार केले जातात. त्यामुळे पाकिस्तानातील हिंदू विशेषतः सिंध प्रांतातले हिंदू अतिशय त्रासात आयुष्य जगत आहेत असे आरोप केले आहेत. त्यामुळे ही निदर्शन करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. पाकिस्तान सरकारवर दबाव आणून कायद्यात बदल व्हावा यासाठी ही निदर्शनं करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
पाकिस्तानात हिंदू अल्पसंख्याक असून त्यांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकवणं बंद करा, अशा अर्थाचे पोस्टर्स या निदर्शन करणाऱ्यांनी झळकवले होते. या प्रकरणी आम्हाला न्याय मिळावा, अशी त्यांची मागणी आहे.



























































