
सातारा, दि. 11 (प्रतिनिधी)-
सातारा जिल्हा न्यायालयासमोर मंगळवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात कोल्हापूरमधील दोन युवक ठार झाले असून, एकजण गंभीर जखमी झाला आहे.
अनिकेत राजेंद्र कुलकर्णी (वय 23, रा. मंगळवार पेठ), आदित्य प्रताप घाटगे (वय 23, रा. कसबा बावडा, दोघे कोल्हापूर) अशी मृत युवकांची नावे आहेत. तर, देवराज अनाप्पा माळी (वय 21, रा. कसबा बावडा) हा जखमी झाला आहे.
अनिकेत, आदित्य आणि देवराज हे तिघे साताऱयात फिरण्यासाठी आले होते. मंगळवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास त्यांची कार जिल्हा न्यायालयासमोर आल्यानंतर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला व ती थेट पूलावरून खाली गेली. कारचा चेंदामेंदा झाल्याने बचावासाठी तिघे मित्र ओरडू लागले. परिसरातील रिक्षा चालकांसह इतरांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी धाव घेऊन बचावकार्य राबवले. अंधार, पाणी, खोल यामुळे बचाव कार्याला अडथळे येऊ लागले. दुर्दैवाने त्यातील एकाचा जागीच मृत्यू झाला. दोघा गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर सकाळी त्यातील एकाचा मृत्यू झाला.






























































