भरधाव मोटार चालकाने दिलेल्या धडकेत पादचारी तरूण ठार झाल्याची घटना 7 ऑगस्टला विश्रांतवाडी परिसरात घडली. याप्रकरणी पसार झालेल्या मोटारचालक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमित मोहन शिंदे (वय 30, रा. धानोरी रस्ता, विश्रांतवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. अमितचा मामेभाऊ राहुल कांबळे (वय 36, रा. विश्रांतवाडी) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अमित 7 ऑगस्टला रात्री साडेअकराच्या सुमारास आळंदी रस्त्याने जात होता. त्यावेळी चव्हाण चाळीसमोर भरधाव मोटार चालकाने अमितला धडक दिली. त्यानंतर चालक घटनास्थळी न थांबता पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या अमितला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पसार मोटारचालकाचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मगदूम तपास करत आहेत.
































































