सत्तारांच्या दिमतीला 11 पीएंचा ताफा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या छत्रछायेखाली अकोल्यातील कृषी व्यावसायिकांवर खंडणीसाठी घालण्यात आलेल्या धाडीचे प्रकरण चर्चेत असतानाच आता सत्तारांना नेमके पीए किती, असा प्रश्न समोर आला आहे. सरकारी आणि खासगी मिळून सत्तार जवळपास 11 पीए बाळगून आहेत. अकोल्यातील छापेमारीत हे सगळेच सहभागी होते.

कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे अकोल्यात एका कार्यक्रमासाठी गेले असतानाच कृषी विभागाने तेथील कृषी व्यावसायिकांवर धाडी घातल्या. या धाड पथकात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांपेक्षा सत्तारांच्या पीएंचाच भरणा होता. नागपूर येथील वादग्रस्त हितेश भट्टड हा या पथकाचा म्होरक्या होता. कृषी अधिकाऱ्यांना कोपऱ्यात बसवून या भट्टडने कृषी व्यावसायिकांना दमदाटी करून चक्क 5 लाखांची खंडणी मागितली. या प्रकरणी कृषी व्यावसायिकांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकोल्यात खंडणीसाठी टाकण्यात आलेल्या धाडींचे प्रकरण गाजत असतानाच कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पीएंच्या गोतावळय़ाचे रहस्यही उलगडू लागले आहे. मंत्र्यांना साधारण सरकारी आणि खासगी मिळून चार ते पाच स्वीय सहायकांचा फौजफाटा दिमतीला देण्यात येतो. अब्दुल सत्तार यांच्याकडे मात्र निवृत्त अधिकारी, जिल्हा परिषदेचा माजी अध्यक्ष, काही राजकीय कार्यकर्ते असा 10 ते 15 जणांचा गोतावळा पीए म्हणून काम करतो. यात एका पोलीस निरीक्षकाचाही समावेश आहे.

हे आहेत सत्तारांचे पीए

  • उदय देवळाणकर – निवृत्त अधिकारी
  • दिलीप देशमुख – निवृत्त अधिकारी
  • भीमराव कुलकर्णी – निवृत्त अधिकारी
  • दीपक गवळी – कृषी अधिकारी
  • प्रशांत ठाकरे – ओएसडी
  • हितेश भट्टड – वादग्रस्त, नागपुरात गुन्हे दाखल
  • शेख अखिल – खासगी
  • शेख बबलू – महिनाभरापूर्वीच काढले
  • शेख वसीम – महिनाभरापूर्वीच काढले
  • सोळुंके सर – खासगी
  • श्रीराम महाजन -जिल्हा परिषदेचा माजी अध्यक्ष

कृषी विभागातील कर्मचाऱ्यांचे मौन

अब्दुल सत्तार तसेच त्यांच्या पीएंच्या दहशतीमुळे कृषी विभागात सध्या चिडीचूप शांतता आहे. कृषी विभागाबरोबरच हे पीए महसूल तसेच इतर विभागांतही लुडबुड करत असतात. सिल्लोड येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवासाठी रसद गोळा करताना तर या पीएंनी विभागात असलेल्या सरकारी कार्यालयातील चपराशांनाही सोडले नव्हते. सत्तारांच्या भीतीपोटी अधिकारी छत्रपती संभाजीनगर विभागात यायलाही तयार नाहीत.

सत्तारांचा गजनी झाला

अकोल्यातील धाडींचे बिंग फुटताच अब्दुल सत्तार यांचा ‘गजनी’ झाला. दीपक गवळी आपला पीए नसल्याची लोणकढी थाप त्यांनी मारली. त्यांना आपण स्वतःच्या स्वाक्षरीने दीपक गवळीची उसनवारीवर ओएसडी म्हणून नियुक्ती केलेल्या पत्राचा जाणीवपूर्वक विसर पडला. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत मोहीम अधिकारी असलेल्या दीपक गवळीला ओएसडी म्हणून घेण्यात येत असल्याचे पत्र त्यांनी कृषी विभागाच्या प्रधान सचिवांना लिहिले होते. श्रीराम महाजन जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना हा दीपक गवळी त्याच्यासाठी खास ‘मोहीम’ अधिकारी म्हणून काम करत होता.