
औराद शहाजानी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडून आलेल्या सभापती, उपसभापती यांच्यासह दोन सचिव व तेरा संचालक यांच्यावर लेखा परिक्षण अहवालानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तक्रारदा कमाल बहादूर पटेल (लेखापरीक्षक श्रेणी-2 सहकारी संस्था) यांचे तक्रारीवरून 15 डिसेंबर रोजी रात्री गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये तत्कालीन सभापती प्रदीपकुमार बाबाराव पाटील (मयत), तत्कालीन उपसभापती लक्ष्मण नामदेवराव आकडे, तत्कालीन सचीव राजेंद्र रावसाहेब तांभाळे (मयत),तत्कालीन संचालक ओमप्रकाश लक्ष्मणराव बिराजदार, तत्कालीन संचालक मुमताज बरकत पठाण, तत्कालीन संचालक सुमनबाई अण्णाराव बिराजदार, तत्कालीन संचालक रविंद्र शिवाजी गायकवाड, तत्कालीन संचालक सुधाकर श्रीनिवास शेटगार, तत्कालीन सचीव रमेश नरसिंग तेलंग, तत्कालीन संचालक हल्लाप्पा विरसंगप्पा कोकणे, तत्कालीन संचालक सुभाष अण्णाराव डावरगावे, तत्कालीन संचालक नुरअहेमद लालअहमद पटेल, तत्कालीन संचालक मैनोद्दीन मन्सुर मोमीन, तत्कालीन संचालक वामन गोपाळराव तांभाळे, बालाजी मधुकर म्हेत्रे यांचा समावेश आहे. या संचालकांनी अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या सभापती, उपसभापती व दोन सचिव आणि संचालकांनी दिनांक 1-4-2014 ते 31-3-2021 या कालावधीत अपहार केला आहे. त्याची रक्कम 38,27,582 रुपये आहे. त्यापैकी काही संचालकांनी 4,40,000 रुपयांचा भरणा केला आहे. उर्वरीत 33,87,582 रुपयांचा अपहार करून कृषी उत्पन्न बाजार समिती औराद शहाजानी यांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरुन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कामत यांच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कामत करीत आहेत.
































































