अपहरण, खंडणीप्रकरणी सरपंचासह तिघांवर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अपहरण आणि खंडणी मागतिल्याप्रकरणी जामखेड तालुक्यातील आपटीच्या सरपंचासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेल चालवण्याच्या कारणावरून झालेल्या वादात गावठी पिस्तूलचा धाक दाखवत अपहरण करणे, लाकडी दांडक्याने मारहाण करून तक्रारदाराच्या नातेवाईकांकडून दोन लाखांची खंडणी वसूल करणे, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यास ठार मारण्याची धमकी देणे या आरोपांखाली आपटीच्या सरपंचासह एकुण तीन जणांवर अपहरण, खंडणी व आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमनाथ शिवदास जगताप ( वय 24, रा. पिंपळगाव उंडा ,ता. जामखेड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आपटीचे सरपंच नंदकुमार प्रकाश गोरे, सचिन बबन मिसाळ व वाल्मीक किसन काळे (सर्व रा. आपटी, ता. जामखेड) यांच्याविरोधात अपहरण, खंडणीसह आर्मअॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी 25 मार्चला त्याच्या पिंपळगाव उंडा येथील घरी आसताना आरोपी हे त्या ठिकाणी आले आणि फिर्यादीस हॉटेल चालवण्याच्या कारणावरून सरपंच नंदकुमार गोरे व सचिन मिसाळ या दोघांनी गावठी कट्याचा व पिस्तूल चा धाक दाखवून शिवीगाळ व दमदाटी करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांनी आणलेल्या विनानंबरच्या चारचाकी वाहनातून फिर्यादीला सरपंच गोरे यांच्या आपटी येथील शेडवर घेऊन गेले. या ठिकाणी फिर्यादीस लाकडी दांडक्याने मारहाण केली. यानंतर फिर्यादीच्या वडील व त्याच्या चुलत्यांकडे दोन लाख रुपयांची मागणी करुन दोन लाखांची खंडणी वसुल केली. त्यानंतर फिर्यादीला सोडून देण्यात आले. तसेच पोलीसात तक्रार केली तर ठार मारण्याची धमकी दिली.

ही घटना 25 ते 26 मार्चदरम्यान घडली आहे. मात्र, फिर्यादी जखमी असल्याने फिर्याद दाखल करण्यास उशीर झाला. सोमनाथ जगताप यांनी रविवारी रात्री जामखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी कर्जतचे उपविभागीय अधिकारी संजय सातव पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील व सहाय्यक पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी भेट दिली आहे. पुढील तपास सपोनि अवतारसिंग चव्हाण करत आहेत.