कुंभारी हल्ला प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल; ग्रामस्थांकडून निषेध सभा

कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथे महाशिवरात्र नियोजन बैठकीस कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे संचालक शिवाजी घुले जात असताना त्यांना अडवून त्यांच्यावर तीन जणांनी हल्ला करून जबर जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या निषेधार्थ कुंभारी ग्रामस्थांनी निषेध सभा घेतली आहे.

राघवेश्वर मंदिराच्या परिसरात महाशिवरात्रीच्या नियोजनाच्या बैठकीस काळे कारखान्याचे संचालक शिवाजी घुले हे आपल्या मोटरसायकल वरून जात असताना त्यांना वाटेतच माकड मंदिराच्या पायऱ्यांजवळ अडवून किशोर विजय कदम, निलेश सुधीर कदम व दत्तू गजानन कदम यांनी त्यांना हॉकी स्टिक आणि लाथा, बुक्क्यांनी मारहाण करत जबर जखमी केले. या घटनेने कुंभारी ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून त्यांनी मंगळवारी या घटनेच्या निषेधार्थ निषेध सभा घेत आपला निषेध नोंदवला आहे. जखमी शिवाजी घुले यांच्यावर सध्या उपचार चालू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विलास कोकाटे करत आहेत.