
सोने व्यापारात गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत फसवणूक केल्याप्रकरणी झवेरी बाजारातील तीन व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरीव परताव्याची हमी देऊन अनेक गुंतवणुकदारांचे डब्बा ट्रेडिंगमध्ये सुमारे 44 कोटी रुपये गुंतवले. यात 36 किलो सोने आणि सुमारे 10 कोटी रुपये रोकड समाविष्ट आहे.
झवेरी बाजारातील एका व्यापाऱ्याची लाडुलाल, पल्लव आणि शुभम या तीन व्यापाऱ्यांशी ओळख झाली. या तिघांनी या व्यापाऱ्याला गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. विविध गुंतवणुकीवर फायदेशीर परताव्याची हमी दिली. सुरवातीला व्यापाऱ्याचा फायदा मिळवून दिल्याने त्याला आत्मविश्वास वाढला. यानंतर त्याने 36 किलो सोने आणि 10 कोटी रुपये रोकड गुंतवली.
मात्र त्यानंतर व्यापाऱ्याला परतावा मिळणे बंद झाले. त्याला विविध खात्यांचे जे चेक देण्यात आले होते ते सर्व बाऊन्स झाले. चौकशी केल्यानंतर तिघा व्यापाऱ्यांना डब्बा ट्रेडिंगमध्ये 44 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे कळले. यानंतर व्यापाऱ्याने लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.