स्वस्तात खत देण्याचे प्रलोभन दाखवत शेतकऱ्याला 80 हजाराचा गंडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अहमदपूर

सध्या पेरणीची लगबग सुरू असून पेरणीची तयारी शेतकरी करत आहेत. पेरणीसाठी आवश्यक असलेले खते, बी – बियाणे स्वस्तात मिळवून देतो असे प्रलोभन दाखवत अहमदपूर तालुक्यातील कोपदेव हिप्परगा येथील एका शेतकऱ्याला एका अनोळखी व्यक्तीने 80 हजाराचा गंडा घातला आहे. या फसवणुकीमुळे ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकरी अडचणीत आला आहे.

तालुक्यातील कोपदेव हिप्परगा येथील शेतकरी बाबुराव दादाराव लवटे (वय 65) हे 2 जून रोजी खाजगी कामानिमित्त अहमदपूर येथे आले होते. काम आटपून सायंकाळी 5 वाजता येथील बसस्थानकामध्ये आले. त्यावेळी चेतन घोलप यांच्याशी त्यांची ओळख झाली. त्याच ठिकाणी एकमेकांच्या व्यवसायाची चर्चा झाली. तेव्हा चेतन घोलपने त्याची ओळख खताच्या कंपनीचा एजंट असल्याची करून दिली. तुम्हाला बाजार भावापेक्षा शंभर रुपयांनी कमी किमतीत शंभर पोते खत घेऊन देतो अशी बतावणी त्याने केली. त्यांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले. 3 जून रोजी परत मोबाईलवरुन चेतन घोलप यांनी खताबाबत चर्चा केली. 4 जूनलाही त्यांच्यात परत चर्चा झाली. तसेच सायंकाळी 5 वाजता अहमदपूर बसस्थानकात त्यांची भेट झाली. याच भेटीत चेतन घोलप यांनी 5 जून रोजी पैसे घेऊन या व खत घेऊन जा असे सांगितले. शहरातील गणेश कृषी सेवा केंद्र येथे घोलपने त्यांना येण्यास सांगितले. तेथे त्यांची घोलपशी भेट झाली. तेथे आपण त्याला 80 हजार रुपये दिले. शंभर रुपयांच्या नोटाचे ठोक घेऊन येतो असे म्हणून तो निघून गेला. बराच वेळ वाट पाहिली, मात्र तो परत आला नाही. त्याचा शोध घेतला असता तो सापडला नाही. त्याचवेळी फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर अहमदपूर पोलीस ठाण्यामध्ये कलम 420 नुसार चेतन घोलप याच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनिलकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली बि.आर. टारपे , सुनिल श्रीरामे करीत आहेत. सध्या पेरणीचे दिवस असून शेतकऱ्यांना कमी दरात खते, बी – बियाणे देतो म्हणून शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन फसवणूकीचे प्रकार होत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन अहमदपूर पोलीस निरीक्षक सुनिलकुमार पुजारी यांनी केले आहे.