शॉर्टकट दर्शनासाठी दमबाजी कराल तर जेलची हवा, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्देश

श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या शॉर्टकट दर्शनासाठी दमबाजी आणि गोंधळ घालणाऱया व्हीआयपी भक्तांवर थेट गुन्हे दाखल करा, असे सक्त निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मंदिरे समिती आणि पोलीस प्रशासनाला दिले आहेत. दैनिक ‘सामना’ने व्हीआयपी भाविकांच्या झुंडशाहीविरोधात आवाज उठवला होता. या बातमीची दखल घेत जिल्हाधिकाऱयांनी स्थानिक प्रशासनाला लेखी आदेश काढले आहेत.

येत्या 6 जुलै रोजी आषाढी एकादशीचा सोहळा पंढरपूर येथे संपन्न होत आहे. दिंड्या आणि पालख्या पंढरपूरकडे वाटचाल करीत आहेत. पालखी सोहळा पंढरीत दाखल होण्यापूर्वी पंढरीनगरी भाविकांच्या गर्दीने फुलून गेली आहे. पंढरीत दाखल झालेले वारकरी चंद्रभागा नदीचे स्नान करून श्री विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी गर्दी करताना दिसत आहेत. त्यामुळे देवाच्या पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून चार किलोमीटर दूरपर्यंत पोहचल्याने पददर्शनासाठी 12 ते 15 तासांचा अवधी, तर मुखदर्शनासाठी 2 ते 4 तासांचा कालावधी लागत आहे.

दर्शन रांगेतील भाविकांना तत्पर आणि सुलभ दर्शन होण्यासाठी मंदिरे समिती कसोशीने प्रयत्न करीत असताना, यामध्ये व्हीआयपी भाविकांची मोठी आडकाठी येत आहे. दरम्यान, आमदार, खासदार, मंत्री, नेते, पदाधिकारी आदींची मोठी वर्दळ पंढरीत वाढली आहे. या व्हीआयपींबरोबर पन्नास ते शंभर लोक दर्शनासाठी घुसखोरी करीत असल्याने दर्शन रांगेतील भाविकांच्या समस्येत भर पडत आहे.