मी कधीही, कुठेही चौकशीसाठी तयार; प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याच्या आरोपावर महुआ मोईत्रांची रोखठोक भूमिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Mahua-Moitra

संसदेत प्रश्न विचारण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांनी हा आरोप केला असून हे प्रकरण भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी संसदेच्या आचारसंहिता समितीपर्यंत तक्रारीद्वारे पोहोचवले आहे. आपण सदर प्रकरणी सीबीआय असो अथवा आचारसंहिता समिती असो कोणासमोरही कधीही चौकशीसाठी हजर व्हायला तयार असल्याचे महुआ मोईत्रा यांनी म्हटले आहे. मोईत्रा यांनी X वर एक संदेश लिहिला असून यात त्यांनी म्हटले आहे की, “मी सीबीआय किंवा आचारसंहिता समिती( ज्यात भाजप सदस्यांचे बहुमत आहे) यांच्यापुढे जेव्हाकधी बोलावले जाईल तेव्हा चौकशीसाठी हजर होण्यासाठी तयार आहे. मला अदानी निर्देशित मीडिया ट्रायलकडे आणि भाजपच्या ट्रोलकडे लक्ष देण्याचा वेळही नाहीये आणि इच्छाही नाही. “

भाजपने आरोप केला आहे की मोईत्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी दर्शन हिरानंदानी यांच्याकडून संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतले होते. सदर प्रकरणात दर्शन हिरानंदानी हे आता सरकारी साक्षीदार बनले आहेत. दर्शन यांनी दावा केला आहे की सरकारला प्रश्न विचारण्यासाठी त्यांनी मोईत्रा यांच्या संसदेच्या लॉग ईनचा वापर केला होता. दर्शन यांनी एक प्रतिज्ञापत्र दिले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की तृणमूलच्या खासदार मोईत्रा यांनी पंतप्रधान मोदी यांना बदनाम करण्यासाठी उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर टीका केली होती. मोईत्रा यांनी प्रश्न विचारण्याच्या बदल्यात आपल्याकडून बंगल्याच्या दुरुस्तीचा खर्च, प्रवासाचा खर्च, सुट्टीमध्ये देशा-विदेशात फिरायला जाण्यासाठीचा खर्च वसूल केल्याचा आरोप दर्शन हिरानंदानी यांनी केला आहे.

मोईत्रा यांनी या प्रतिज्ञापत्रावर शंका उपस्थित केली असून त्यांनी म्हटले आहे की हे प्रतिज्ञापत्र कोऱ्या कागदावर लिहिण्यात आले आहे. सदर प्रतिज्ञापत्र नोटरी करण्यात आलेले नाही किंवा ते कोणत्या लेटरहेडवरही देण्यात आलेले नाही. एक मोठा व्यावसायिक कोऱ्या कागरादवर प्रतिज्ञापत्र लिहून सही का करेल ? असा प्रश्न मोईत्रा यांनी विचारला आहे. एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर बंदूक ठेवल्यानंतर ती व्यक्ती असे करेल असे मोईत्रा यांनी म्हटले आहे. मोईत्रा यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.