विभागीय कृषी सहसंचालकांकडून कुडाळमधील फळप्रक्रिया उद्योगाची पाहणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोकण विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक विकास पाटील यांनी कुडाळमधील विविध प्रकल्पांना भेट देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

या भेटीदरम्यान रेश्मा गुरुनाथ सावंत यांच्या काजू प्रक्रिया प्रकल्पास भेट देऊन आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित काजू प्रक्रिया संबंधित यंत्रांची पाहणी केली. यामध्ये काजू गराचा आकार व रंगानुसार काजू गार विभागणी होणाऱ्या मशनरीची पाहणी केली. तसेच काजू बियांच्या आकारमानानुसार काजू बियांची विलगिकरण  होणाऱ्या मशनरीची पाहणी केली.

रेश्मा सावंत यांनी हा प्रकल्प राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत सन 2015 साली मंजूर असून कृषी विभागाच्या माध्यमातून प्रकल्पाची उभारणी करून प्रकल्पांतर्गत प्रति दिवस साठ मजूर कामासाठी असून गावातील महिलांना रोजगार उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. या प्रकल्पातून दर दिवशी एक टन काजू गरांची प्रक्रिया केली जाते.

भास्कर नारायण कुंभार यांच्या दोन हेक्‍टर क्षेत्रावरील भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत हापूस आंबा लागवडीची पाहणी करण्यात आली. आंबा कलमांना पाणी व खत व्यवस्थापन करिता ठराविक अंतरावर पाण्याच्या टाकी बसवून ड्रीप द्वारे पाणी व खत व्यवस्थापन करून मजूर खर्चाची बचत केली असल्याचे  कुंभार यांनी सांगितले.

अच्युत तेंडुलकर यांच्या प्रक्षेत्रावरील विविध मसाला लागवडची पाहणी करण्यात आली. या प्रक्षेत्रावरील नारळ,  सुपारी,  वेलची,  जायफळ,  लवंग,  दालचिनी यासारख्या मसाला पिकांची पाहणी केली. या पाहणी दरम्यान सुपारी काढणी मशीन व सुपारी व नारळ पिकावर औषध फवारणी मशीनच्या प्रात्यक्षिकाचा अनुभव स्वतः श्री. पाटील यांनी घेतला.

या भेटीदरम्यान जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सिद्धाना म्हेत्रे, उपविभागीय कृषी अधिकारी अजित अडसुळे, तालुका कृषी अधिकारी रमाकांत कांबळे, मंडळ कृषी अधिकारी संदीप दोलताडे, कृषी पर्यवेक्षक सुधाकर खरवडे,  तेंडोली गावच्या कृषी सहाय्यक रश्मी कुडाळकर, गावचे सरपंच मंगेश प्रभू, ग्रामपंचायत सदस्य तिमाजी राऊळ, कृषी मित्र सुनील मुननकर व शेतकरी उपस्थित होते.